Pune News : पुण्यात 53 केंद्रांवर आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लस

एमपीसी न्यूज : सरकारच्या नव्या लसीकरण धोरणानुसार आजपासून (बुधवार) 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी 53 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी कोविशील्ड लस दिली जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. 

 शहरात कोरोना लसीकरणाची मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. नव्या लसीकरण धोरणामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळेल. शहरातील 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या आणि व्यापकता लक्षात घेऊन महापालिकेने लसीकरणाचे नियोजन केले आहे.

शहरातील 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण होणे, हा महत्त्वाचा टप्पा आहे. ‘पहिल्या दिवशी आपण 53 केंद्रांवर लसीकरण करत असून प्रत्येक केंद्रांवर 100 कोविशील्ड लस उपलब्ध करुन दिल्या आहेत. प्रत्येक केंद्रांवर 70 टक्के डोस हे ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंग केलेल्या नागरिकांना तर 30 टक्के डोस हे ऑन स्पॉट नोंदणी करुन उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाईन नोंदणी बुधवारी सकाळी 8 वाजता सुरु होणार असल्याचे महापौरांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.