Dehuroad Crime News : देहूगाव येथील महावितरणच्या कार्यालयास टाळे लावल्या प्रकरणी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – देहूगाव येथील महावितरणच्या कार्यालयास टाळे लाऊन आंदोलन केल्याप्रकरणी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेअकरा वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. देहूगाव येथे घडली.

भाजपा स्वच्छ भारत अभियान पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सदाशिव हगवणे (वय 40), सचिन मारुती मराठे (वय 40, दोघे रा. देहूगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र मोहन डवरी (वय 35, रा. चिखली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुरुवारी सकाळी त्यांच्या कार्यालयात असताना आरोपी कार्यालयात आले. ‘आम्ही तुमच्या वरिष्ठ कार्यालयास नोटीस देऊन देखील कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता देहूगाव शाखेसाठी उपलब्ध झालेला नाही. वीजपुरवठा नेहमी खंडित होतो. आम्ही तुमच्या कार्यालयाला टाळा टाळून ताळाबंद आंदोलन करणार आहोत, तरी तात्काळ हातातील काम बंद करा आणि बाहेर निघा’ असे आरोपी फिर्यादी यांना म्हणाले. ‘मला ऑफिसमध्ये जाऊन माझे शासकीय काम करू दे’ असे फिर्यादी यांनी सांगितले असताना देखील आरोपींनी त्यांना कार्यालयात जाण्यास अटकाव करून कार्यालयाला बाहेरून टाळा लावला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.