Bhosari : अस्तित्व टिकविण्यासाठी आढळरांवाना मताधिक्य दिल्याचा महेश लांडगेंचा कांगावा- दत्ता साने

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड सुरु केली आहे. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांना भोसरीतून 37 हजाराचे मताधिक्य दिल्याची ‘दंवडी’ पिटविली जात आहे. आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, 33 नगरसेवक असूनही केवळ 37 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. आम्ही विरोधात असूनही शिवसेनेचे मताधिक्य 50 हजारांनी कमी केले असून यातच भोसरीतील जनतेने शिवसेना-भाजपला नाकारले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याने मताधिक्याचा हा कांगावा महेश लांडगे यांनी आवरता घ्यावा असे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी म्हटले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भोसरीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वासही साने यांनी व्यक्त केला. 

साने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असतानाही लोकसभेच्या निवडणुकीला शहरातून शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना आजपर्यंत मताधिक्य मिळत होते. मतदारसंघ एकत्रित असताना बारामतीतून शरद पवार साहेब उमेदवार असताना देखील भाजप उमेदवारांना भोसरी परिसरातून मताधिक्य मिळत होते. सन 2009, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. भोसरीचा आमदार राष्ट्रवादीचा होता.

अनेक नगरसेवक, नगरसेविका होते. तरी देखील राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा शिवसेना-भाजपचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना भोसरीतून 87 हजाराचे मताधिक्य होते. आता परिस्थिती विरोधात असतानाही राष्ट्रवादीने 50 हजाराने शिवसेना-भाजपचे मताधिक्य कमी केले आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. भोसरीचा आमदार, आजी-माजी महापौर, आजी-माजी स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, 33 नगरसेवक, नगरसेविका असतानाही केवळ 37 हजारांचे मताधिक्य शिवसेना-भाजप उमेदवाराला मिळाले आहे. तरीही, आमदारांकडून त्याचा डंका पिटविला जात आहे. स्व:ताचे अस्तित्व टिकविण्यासाठी आमदारांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.

त्याउलट विरोधात असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेच्या आशीर्वादाने तब्बल 50 हजाराचे मताधिक्य कमी केले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीने मताधिक्य कमी केले आहे. यातून भोसरीतील जनतेने राष्ट्रवादीला कौल दिला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. शिरुरचा विजय हा मतदारराजाचा विजय आहे, असेही साने म्हणाले.

आमदार आणि त्यांच्या बगलच्यांना भोसरीतील जनता वैतागली आहे. त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीतील मतदानातून आला आहे. त्यामुळे कोणीही मताधिक्य दिल्याची दवंडी पिटवली तरी त्याचा विधानसभेला उपयोग होणार नाही. भोसरीत विधानसभेला नक्की परिवर्तन होणार असून त्यासाठी जनता सज्ज झाली आहे. भोसरीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास साने यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.