Maval New : बैलगाडा प्रेमींच्या उत्साहावर राज्य सरकारच्या निर्णयाने विरजण

एमपीसी न्यूज – मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या लढ्याला सशर्त का होईना पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने यश मिळाले. आता सर्जा राजा शर्यतीच्या घाटातून धावणार, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळणार असे आशेचे वातावरण शेतकरी, बैलगाडा मालक आणि बैलगाडा प्रेमी यांच्यात निर्माण झाले. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य शासनाने व जिल्हाधिका-यांनी या शर्यतीला स्थगिती दिली. 1 जानेवारी रोजी मावळ तालुक्यातील नाणोली येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या आदेशाने ही शर्यत रद्द करावी लागली आहे. यामुळे बैलगाडा प्रेमी, शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

मावळ तालुक्यात नानोली तर्फे चाकण गावात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भव्य बैलगाडा शर्यतीचे शनिवारी दि.1/1/2022 रोजी आयोजन करण्यात आले होते. मावळ तालुक्यासह खेड, शिरूर, हवेली, मुळाशी, आंबेगाव व घोडेगाव आदी भागात या शर्यतीची चर्चा रंगली होती. गायींच्या वासराला तसेच शर्यतीच्या बैलांच्या किंमती वाढणार प्रत्येक जण घाटाचा राजा मीच होणार असा आत्मविश्वास निर्माण झाला होता. सात वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीच्या घाटाची दुरुस्ती तसेच डागडुजी करुन गावच्या यात्रा तसेच वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे नियोजन सुरु झाले होते.

जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध कडक केल्याने गर्दीचा विचार करुन बैलगाडा शर्यती रद्द केल्या. सात वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीत टेम्पो व पिकअप, छोटेमोठे दुकानदार, निवेदक, हलगी वाले, साऊंड सिस्टीम, मंडप, फ्लेक्स आदी व्यावसायिकांना रोजगार मिळणार होता; पण अचानक बैलगाडा शर्यत रद्द केल्याने त्यांचा रोजगार बंद झाला. शेतकऱ्यांनी बैल व वासरे धुवून भंडारा लावून शर्यतीत पळविण्याची तयारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठविली पण कोरोनाच्या कारणाने शर्यत रद्द केली.

शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण टाकले – 

राजकीय कार्यक्रम निवडणुका सुरू असल्यावर कोरोनाची भीती नसते पण सामाजिक व शेतकऱ्यांच्या कार्यक्रमावर का बंधने? सरकार किती कडक निर्बंध लावणार याला काही मर्यादा आहेत का ? सर्वसामान्य जनतेला सरकारचे डावपेच समजू लागले आहेत. सर्वसामान्य शेतकरी व छोटेमोठे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचे काय ?

आणखी किती दिवस कोरोनाच्या नावावर जनतेला वेठीस धरणार, शाळा, महाविद्यालय, लग्न व कार्यक्रमावर बंदी का? राजकीय कार्यक्रमावर बंदी का नाही. आता तरी कोरोनाच्या नावावर भीती फसरवून नागरिकांचा बळी घेण्याचे थांबवा. कोरोनाचे षड्यंत्र उघड झाले असून नागरिक बिनधास्त झाले आहेत. सामाजिक कार्यक्रम व बैलगाडा शर्यतीवर बंदी आणू नये असे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांमधून प्रतिक्रिया उमटत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.