Dehuroad : देहूरोड येथील धम्मभूमीवर भीम अनुयायांचा जनसागर

एमपीसी न्यूज : देहूरोड (Dehuroad) येथील ऐतिहासिक धम्म भूमीच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त भीम अनुयायांचा जनसागर येथे जमला होता. या वर्षी मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कारण गेली दोन वर्षे करोना काळात घातलेली निर्बंध आता शिथिल करण्यात आली आहेत.

देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 68 वर्षांपूर्वी ( 25 डिसेंबर 1954 रोजी) ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना स्वतःच्या हाताने केली होती. या ऐतिहासिक घटनेला रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी 68 वर्षे पूर्ण होत असल्याने मोठ्या संख्येने भीम अनुयायी येथे जमले होते. त्यांनी सकाळपासून ऐतिहासिक धम्मभूमीतील बुद्धमूर्ती तसेच डॉ. बाबासाहेब यांच्या अस्थिस्तुपाचे सकाळपासून रांगेत उभे राहून मनोभावे दर्शन घेतले.

सकाळी 11 वाजता ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून व मेणबत्ती लावून पूजन करण्यात आले. महाबुद्ध वंदना शिलयाचना, क्षमयाचना अभिवादन गाथा बुद्ध पूजा भीमस्मरण त्रिसरण बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर संघ वंदना भिकू आशीर्वाचन झाले. तसेच, 22 प्रतिज्ञा व धम्मपालन गाथा घेण्यात आली.

बुद्ध विहारालगत असलेल्या मैदानावर आयोजित महाबुद्ध वंदनेला देशाच्या विविध भागातून आलेल्या भक्तांसह सुमारे लाखाहून अधिक बौद्ध अनुयायी उपस्थित होते. विदर्भातील नागरिकांनी धम्म रॅली काढली. त्यानंतर पहिली अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन झाले. माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे त्याचे उद्घाटक होते, तर आमदार सुनील शेळके स्वागताध्यक्ष होते.

Nigdi News: पवळे क्रीडांगण क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करा – सचिन चिखले

यावेळी राजरत्न आंबेडकर यांचा विशेष सत्कार (Dehuroad) करण्यात आला. यानंतर पुरस्कार वितरण समारंभ झाला. विजय जाधव (प्रबुद्धरत्न), गोविंद गायकवाड (साहित्यरत्न), प्रा. डॉ. महेश देवकर (पालीरत्न), भीमशाहीर बापूसाहेब पवार (स्वर रत्न), न्यायमूर्ती शरद मडके (न्याय रत्न), सुरेश भिकाजी शिंदे व साहेबराव सुरवाडे (समाज रत्न) आदींचा पुरस्कारार्थीमध्ये समावेश होता. प्रा. डॉ. महेश देवकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यानंतर संध्याकाळी भीम गीत गायनाचा कार्यक्रम झाला.

भीम अनुयायी यांच्या सेवेसाठी विविध पक्ष, सामाजिक संस्था, मंडळे, प्रतिष्ठानांनी पोहे, चहा, पाणी, मसाला भात, पुरी भाजी, अल्पोहार असे अन्नदान केले. भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो व मूर्ती तसेच खेळणी, पुस्तके, कॅलेंडर, विविध साहित्य विक्रेत्यांच्या दुकानांनी परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.

आसपासच्या परिसरात देहूरोड पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देहूरोड वाहतूक विभागाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्याकरिता पुणे- मुंबई महामार्गावरील सार्वजनिक वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.