Dehuroad : हजारो बौद्ध अनुयायींनी केली बुद्धवंदना

देहूरोड बौद्ध विहाराचा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – देहूरोड येथे हजारो बौद्ध अनुयायीनीं सोमवारी (दि. 25) बुद्धवंदना (Dehuroad) केली. 25 डिसेंबर 1954 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते देहूरोड येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दरवर्षी 25 डिसेंबर रोजी बौद्ध अनुयायी एकत्र जमतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बौद्ध अनुयायींनी एकत्र येत 69 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा केला.

देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर सकाळी संपूर्ण देशभरातून बौद्ध अनुयायी एकत्र आले. देहूरोड येथील धम्मपीठावर शेकडो बौद्ध भिक्खू आले. बुद्ध काळाच्या प्रभावानंतर सुमारे 1200 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतभूमीत बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेले देहूरोड येथील हे बुद्ध विहार अद्वितीय ठरलेले आहे.

सोमवारी सकाळी सात वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ गुरुजी यांच्या नेतृत्वात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विविध पक्ष आणि संघटनांनी देखील मानवंदना दिली. दिवसभर देशभरातून आलेल्या बौद्ध अनुयायींनी बुद्धांना मानवंदना दिली.

बौद्ध विहार परिसरात मोफत अन्नदानाचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dehuroad) आणि इतर महापुरुषांवर आधारित वैचारिक पुस्तकांचे देखील स्टॉल लावण्यात आले होते. वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. मानवंदनेनंतर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहिली. हजारो अनुयायींनी दिवसभरात बौद्ध विहारात उपस्थिती दर्शवली.

डॉ. बाबासाहेबांना डोळे बंद करून एकाच ठिकाणी बसलेले तथागत बुद्ध अभिप्रेत नव्हते. तथागत बुद्ध देशाच्या कानाकोपऱ्यात अखंडपणे डोळे उघडे ठेवून आयुष्यभर फिरत राहिले, जगाचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि त्यांचे हे भ्रमण पायी चालत असे. तथागत गौतम बुद्धांनी कधीही वाहन अथवा साधन प्रवासासाठी वापरले नाही. डॉ. बाबासाहेबांना डोळे उघडे असलेले तथागत बुद्ध अपेक्षित होते.

रंगून येथे अशीच डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांना मिळाली. त्याच मूर्तीची देहूरोडच्या विहारात स्थापना करण्यात आलेली आहे. त्यावेळी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ही ऐतिहासिक घटना फार महत्त्वाची असून या घटनेची नोंद इतिहासात होईल आणि या लहान बुद्ध मंदिरापासून धम्मक्रांतीला सुरुवात होईल’ असे उद्गार काढले होते.

भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका दक्षिण विभागाचे सरचिटणीस हनुमंत गायकवाड म्हणाले, “दिवसभर शिस्तबद्ध कार्यक्रम झाला. बौध्द विहार ते देहूरोड बाजार आणि सेन्ट्रल चौकापर्यंत अनुयायींनी गर्दी केली होती. पोलिसांनी चोख नियोजन केले. त्यांना समता सैनिक दल आणि इतर संघटनांनी सहकार्य केले. देशभरातून आलेल्या बौद्ध अनुयायींसाठी ही अनोखी पर्वणी असते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.