Dehuroad : महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत मागितले 20 लाख रुपये

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad) कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांचा अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली असून त्याच्याकडून जबरदस्तीने चार लाख 98 हजार रुपये घेतल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. त्यांच्यासह अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा, शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bjp : सत्तेसाठी तडजोडी करणे ही भाजपची अपरिहार्यता – अमित गोरखे

याप्रकरणी वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (वय 19, रा. किवळे, पुणे. मूळ रा. झारखंड) या तरुणाने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे आणि मोहम्मद अहमेर मिर्झा या चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौहान हा तरुण किवळे येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो महाविद्यालयाच्या हॉटेलमध्ये राहतो. देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार आणि अन्य आरोपींनी मिळून चौहानकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजता आरोपींनी किवळे येथील एका कॅफे मधून अपहरण केले.

कॅफे मधून मायाज लॉन्ज, गहुंजे स्टेडीयम आणि तिथून तरुणाला (Dehuroad) देहूरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी देण्यात आली. हा सगळा प्रकार टाळायचा असेल तर 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

पोलिसांसह अन्य लोकांच्या धमकीला घाबरलेल्या चौहान याने गुगल पे आणि नेट बँकिंगद्वारे आरोपींना चार लाख 98 हजार रुपये दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मात्र संबंधित पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या गुन्ह्याचा तपास देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे करीत आहेत. त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.