Dehuroad : भाजप नगरसेवकावर गोळीबारप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान सदस्य आणि माजी उपाध्यक्ष विशाल ऊर्फ जिंकी खंडेलवाल यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. आरोपीच्या भाऊ आणि मित्रावर दाखल जुन्या गुन्ह्यात खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन देहूरोड बाजारपेठ बंद ठेवल्याच्या रागातून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

साबीर समीर शेख (वय 19, रा. तळेगाव स्टेशन), साईतेजा ऊर्फ जॉनी शिवा चिंतामल्ला (वय 19, रा. ऑर्डीनन्स फॅक्टरी, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा भाऊ आणि मित्र यांच्यावर मागील काही दिवसांपूर्वी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन देहूरोड बाजारपेठ बंद ठेवल्याचा राग आल्याने दोघांनी मिळून 13 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खंडेलवाल यांच्यावर गोळीबार केला. देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल देखील जप्त केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, सहाय्यक फौजदार सुभाष सावंत, पोलीस कर्मचारी प्रमोद उगले, संकेत घारे, प्रमोद सात्रस, नारायण तेलंग यांच्या पथकाने केली.

  • असा झाला होता विशाल खंडेलवाल यांच्यावर गोळीबार
    विकासनगर देहूरोड येथे खंडेलवाल यांचे कार्यालय आहे. 13 जून रोजी सायंकाळी ते कार्यालयात आले. कार्यालयातील कामकाज आटोपून सायंकाळी साडेसातच्या सुमारास कार्यालयाच्या बाहेर त्यांचा चालक महंमद शेख आणि रमजान यांच्याशी उद्याच्या कार्यक्रमाची चर्चा करत होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले. त्यातील एकाने दुचाकीवरून खाली उतरून खंडेलवाल यांना शिवीगाळ करून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. खंडेलवाल मागे सरकल्यामुळे त्यांना गोळी लागली नाही. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खंडेलवाल ओरडत पळत असताना पाय-यांवर पडले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला मार लागला. दरम्यान, घटना घडल्यानंतर खंडेलवाल यांच्या ओळखीचे राजेश खंडेलवाल आरोपींच्या दिशेने पळाले असता आरोपींनी राजेश यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दोन्ही आरोपी मोटारसायकल वरून पळून गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.