IPL 2021: दिल्ली कॅपिटलने हैदराबादवर दणदणीत विजय मिळवत गाठले अव्वल स्थान

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – दुबई येथे झालेल्या आजच्या 33 व्या सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळताना हैदराबाद सनरायजर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली खरी,पण त्यांच्या पदरी केवळ आणि केवळ निराशाच आली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सर्वांगसुंदर खेळ करत आज मोठा विजय मिळवत 14 गुणही मिळवले आणि गुणतालिकेत प्रथम स्थानही!

आजच्या सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना अतिशय खराब सुरुवात केली.  विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर तर आज भोपळा सुद्धा फोडू शकला नाही, तर त्याचा दुसरा साथीदार वृद्धीमान साहासुद्धा विशेष चमक दाखवू शकला नाही, त्याने केवळ 18 धावाच काढल्या.

वॉर्नर नोर्जेचा तर रबाडाचा बळी साहा ठरला. 2 बाद 29 अशी कठीण अवस्था झाली तेव्हा कर्णधार केन विल्यमसन आपली जबाबदारी ओळखून डाव सावरेल असे वाटत होते मात्र त्यानेही मनीष पांडे सोबत केवळ आणखी 31 धावाची भागीदारी केल्यानंतर तो अक्षर पटेलची शिकार ठरला आणि केवळ एकाच धावेची भर घालून मनीष पांडे सुद्धा रबाडाच्या हाती झेल धावून त्याचीच शिकार झाला.

1 बाद शून्य, दोन बाद 29 आणि 4 बाद 61 अशी अवस्था झाल्यानंतर हैदराबाद संघ किती आणि कसा सावरणार असे वाटत होतेच, त्यात केदार जाधव सुद्धा वैयक्तिक तीन धावा करून बाद झाला, मात्र अब्दुल समदने शेवटी शेवटी मारलेल्या काही साहसी फटक्यांमुळे हैदराबाद संघ कसे तरी दिल्ली कॅपिटल्स पुढे 135 धावाचे माफक आव्हान उभे करू शकला. दिल्ली कडून रबाडाने अतिशय घातक गोलंदाजी करताना तीन तर अक्षर पटेल व नोर्जेने प्रत्येकी दोन दोन बळी घेत त्याला उत्तम साथ दिली.

दरम्यान, उत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉ व या स्पर्धेतला आत्तापर्यत सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या शिखर धवन या दोघांच्या सफल जोडीने सुरुवात केली. पृथ्वी शॉ केवळ अकराच धावा करून बाद झाला खरे, पण दिल्ली कॅपिटल्सच्या मजबूत फलंदाजीला विशेष फरक पडणार नव्हताच.

केवळ दुखापतीनंतर आलेला श्रेयस अय्यर कसा खेळेल याची उत्सुकता सर्वाना होती. तिसऱ्या नंबरवर खेळणारा धडाकेबाज श्रेयस दुखापतीमुळे वर्ल्डकपच्या संघाबाहेर पडलेला असला तरी तो राखीव मध्ये आहेच त्यामुळे त्याला मी तयार आहे हे सिद्ध करून दाखवायचे होतेच आणि त्याने ही संधी अजिबात गमावली नाही अन् संघाला नाबाद राहत विजय मिळवून तर दिलाच पण त्याचसोबत त्याने मी सम्पूर्णपणे फीट आहे असाच संदेश सुद्धा आजच्या नाबाद 47 धावांच्या खेळीदरम्यान दिली.

शिखर धवनच्या साथीने त्याने दुसऱ्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली त्यानंतर आलेल्या आणि अय्यरच्या दुखापतीमुळे कर्णधारपदी असलेल्या ऋषभ पंतने आपल्या नावलौकिकाला जागत जबरदस्त फलंदाजी करताना संघाला आठ गडी आणि 13 चेंडु राखुन मोठा विजय मिळवून देताना नाबाद 35 धावा केवळ 21 चेंडुत चोपताना तीन चौकार आणि दोन षटकार सुद्धा मारले.

एकंदरीतच हा सफाईदार विजय दिल्ली कॅपिटल्स संघांसाठी मोठा आहेच.  या दमदार खेळीमुळे त्यांच्या आत्मविश्वासात सुद्धा नक्कीच भर पडेल. त्याचसोबत मुख्य कर्णधार श्रेयसचे तंदुरुस्त होणे सुद्धा शुभसंकेत ठरेल. फक्त वर्ल्डकपसाठी निवडला गेलेल्या अश्विनची आजची स्वैर गोलंदाजी हा एकमेव चिंताजनक विषय ठरू शकतो. हैदराबाद संघापुढे मात्र बरेच प्रश्नचिन्हे आहेत आणि यापुढे त्यांना प्रचंड मेहनतीसोबत नशीबाची सुद्धा साथ लागेल. अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करून दोन बळी मिळवणार ऍडम नोर्जे या खेळात सामनावीर ठरला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.