Delhi News : माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी उडवले प्रवासी विमान, डीएमके खासदार मारण यांनी सांगितला अविस्मरणीय प्रवासाचा किस्सा ‌

एमपीसी न्यूज – भाजप सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केलेल्या राजीव प्रताप रुडी यांनी दिल्ली ते चेन्नई दरम्यान इंडीगो कंपनीचे विमान उडवले. या विमानात डीएमके खासदार दयानंद मारण उपस्थित होते, त्यांनी या अविस्मरणीय प्रवासाचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दयानंद मारण आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात, दिल्लीतील संसदीय बैठक उरकून मी चेन्नईला जाण्यासाठी विमानात बसलो. त्यावेळी तिथे आलेल्या वैमानिकाने ‘तुम्ही सुद्धा या फ्लाईट मधून प्रवास करत आहात’? असा प्रश्न विचारला. वैमानिकाने मास्क घातले असल्याने मी त्यांना ओळखू शकलो नाही म्हणून मी होकारार्थी मान हलवली. त्यानंतर तो वैमानिक हसला व ‘तुम्ही मला ओळखलं नाहीत असं दिसतंय’ अशी विचारणा केली. त्यानंतर मला ओळख पटली की हे दुसरे कुणी नसून माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री खासदार राजीव प्रताप रुडी आहेत.

दोन तासांपूर्वी आम्ही दोघेही संसदीय बैठकीसाठी एकत्र होतो. आणि आता त्यांचे एका राजकीय नेत्यातून वैमानिकात झालेलं रुपांतर अविश्वसनीय आहे. तुम्ही हे विमान उडवणार आहात याचा मला विश्वासच बसत नाही असे मी त्यांना म्हणालो. माझा एक चांगला सहकारी आणि मित्र आमच्या विमानाचं सारथ्य करतोय ही माझ्यासाठी फार सुखावह बाब असल्याचे मारण आणि आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

माझ्यासाठी हा एक नक्कीच अविस्मरणीय असा प्रवास होता असे डीएमके खासदार दयानंद मारण यांनी म्हटले आहे. भाजप खासदार राजीव प्रताप रुडी हे बिहारमधील छापरा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजप सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच, राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.