pimpri : पाणीपुरवठा विस्कळीत, नियोजन कोलमडले

उंचावरील भागात पाणी जाण्यास अडचणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहाराला गुरुवारपासून दररोज पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने पाणी वितरणामध्ये अडचण येत असून उंचावरील भागात पाणी जाण्यास अडचणी येत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे महापालिकेने सांगितले. 

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणात 100  टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

पाच महिन्यांपासून सुरु असलेली पाणीकपात रद्द करत बुधवारी (दि. 7) पासून शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा सुरु केला. परंतु, पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दोन दिवसांपासून पाण्याच्या तक्रारी येत आहेत.

एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असताना महानगरपालिका दिवसाला 450 एमएलडी पाणी उचलत होती. आता दररोज पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर 475 एमएलडी पाणी उचलले जात आहे. केवळ 25 टक्के जास्त पाणी उचलले जात आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे वितरणामध्ये अडचण येत आहे. एकदम पाणी सोडल्याने उंचावरील भागात पाणी जात नाही. टाक्या भरत नाहीत. त्यामुळे पाण्याचा नियोजन कोलमडले आहे.

पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असताना महानगरपालिका दिवसाला 450 एमएलडी पाणी उचलत होती. आता दररोज पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर 475 एमएलडी पाणी उचलले जात आहे. पाण्याची मागणी वाढली आहे. संपूर्ण शहराला दररोज पाणी द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उंचावरील  भागात पाणी जात नाही. टाक्या भरत नाहीत. एकमद पाणी सोडल्यानंतर उंचावरील भागाला पाणी मिळत नाही. त्यासाठी आज पाणीवाटपात काही बदल केले आहेत. एका भागाला दोन-दोन तास पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे पाण्याच्या तक्रारी कमी आल्या. व्यवस्थित पाणी मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.