Talegaon Dabhade : डायबेटीस हा रोग नाही तर विकार – डॉ. अजित माने

एमपीसी न्यूज – डायबिटीस हा रोग नसून चुकीच्या जीवन पद्धतीमुळे झालेला तो विकार आहे. आहार, व्यायाम आणि निद्रा यांच्या योग्य वेळा पाळल्या गेल्या तर डायबिटीस पूर्णतः नियंत्रणात आणता येतो. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अजित माने यांनी केले.

जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित मोफत मधुमेह आरोग्य तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुदीप कुमार, डॉ. राजेंद्र देशमुख, होमिओपॅथ तज्ज्ञ डॉ. माधुरी जगताप, आयुर्वेदाचार्य डॉ. शुभांगी माने, आरोग्य समाजसेविका शबनम खान आदि मान्यवर उपस्थित होते.

कोरोना काळात मधुमेहींना आरोग्य आणि उपचाराच्या कठीण समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यातून सावरण्याबाबत डॉक्टरांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. शिबिरात अलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचाराच्या सुमारे शंभरावर रुग्णांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्याचे अथर्व हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका सारिका शिंदे यांनी सांगितले.

कोविड लॉकडाऊन काळातील मानसिक ताणतणावामुळे डायबिटीसची लक्षणे तीव्र जाणवू लागली आहेत. डायबेटीसचे ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. आहार आणि हलक्या व्यायामातील सातत्य राखून डायबेटीसला दूर ठेवता येणं शक्य आहे तसेच नियमित तपासणी आणि औषधोपचारही महत्त्वाचे आहेत असे या शिबीराच्या निमित्ताने सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.