Pimpri : डॉ. राजेश वाबळे यांची ‘वायसीएमएच’च्या अधिष्ठातापदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेच्या प्रशासकिय कामकाजासाठी अधिष्ठातापदी डॉ. राजेंद्र वाबळे यांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडील प्रतिनियुक्तीवर महापालिकेत कार्यरत असलेले डॉ. पद्माकर पंडित यांच्याकडून अधिष्ठातापदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरु केल्या जाणा-या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अधिष्ठाता पदाची नेमणूक करणे आवश्यक होते. त्याकरिता राज्य शासन सेवेतील डॉ. पद्माकर पंडित यांची या पदावर वर्णी लावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना या पदावर मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वी मानधन तत्त्वावर अधिष्ठाता पद भरण्याबाबत महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यावेळी मुलाखत घेऊन डॉ. वाबळे यांची या पदाकरिता निवड करण्यात आली होती.

मात्र, त्यावेळी ते रुजू न झाल्याने या पदावर डॉ. पंडित हेच कार्यरत होते. दरम्यान, डॉ. वाबळे यांनी या पदावर रुजू होण्याची तयारी दर्शविल्याने अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी 3 मे रोजी अधिष्ठाता पदाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपविला आहे. तर, महापालिका वैद्यकीय विभागप्रमुख आणि विशेष कार्य अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. पंडित यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.