Lonavala : दूधिवरे खिंड वाहतुकीसाठी धोकादायक !

तक्रारीनंतरही प्रशासनाचा कानाडोळा; स्थानिकांचा आरोप

तातडीने रुंदीकरण करून संरक्षक कठडे बसविण्याची मागणी  

एमपीसी न्यूज – लोणावळा आणि पवन मावळ यांना जोडणारी दुधिवरे खिंड ही वाहतुकीसाठी धोकादायक बनली आहे. पावसामुळे या ठिकाणी सतत दगड कोसळतात. तसेच पावसामुळे झाडांच्या मुळांची माती वाहून गेल्याने झाडे कधीही उन्मळून पडू शकतात. त्यामुळे लोणावळा तसेच पवन मावळात वेगवेगळ्या कामासाठी येणारे नागरिक, दूधवाले, विद्यार्थी, शिक्षक, पर्यटनासाठी येणारे असंख्य पर्यटक यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. प्रशासनाला वारंवार तक्रार देऊनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून एखादी दुर्घटना घडण्याआधी प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

लोणावळा आणि पवन मावळ यांना दुधिवरे खिंडीने जोडले आहे. हा १७ किलोमीटरचा रस्ता आहे. लोणावळा आणि पवन मावळ दोन्ही बाजूच्या नागरिकांना हा मार्ग सोयीस्कर असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ चालू असते. लोणावळा-खंडाळ्यानंतर पर्यटन केंद्र म्हणून पर्यटक पवना धरण परिसराला पसंती देतात. या भागात लोहगड, विसापूर, तुंग किल्ले आहेत. दुधिवरे खिंड अतिशय अरुंद आहे. या भागात अनेक वेडीवाकडी वळणे आहेत. रस्ता अरुंद आहेच त्याबरोबर रस्त्याला संरक्षक कठडेही नाहीत. मावळात पावसाचे प्रमाण जास्त असते. ही खिंड धोकादायक बनलेली आहे. या खिंडीतील प्रवास दगडी कोसळण्याच्या भीतीने धोकादायक झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील काही काळापासून मोकळे झालेले दगड पावसाळ्यात खाली पडत आहेत. तसेच मातीसुद्धा घसरते.

पावसामुळे झाडांच्या मुळाखालची माती वाहून गेली आहे. त्यामुळे ही झाडे कधी पडतील याचा नेम नाही. नागरिकांना आणि पर्यटकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, असे असताना देखील दुधिवरे खिंड देखभाल दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना व पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

लोणावळा पवन मावळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याची दखल घेऊन रस्त्यांची व दुधिवरे खिंडीची दुरुस्ती करण्याची गरज आहे. प्रत्येक पावसाळ्यात दगडी कोसळण्याच्या घटना घडतात. दुधिवरे खिंडीत कोणत्याही क्षणी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. दरड कोसळण्याच्या भीतीने नागरिकांना जप करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरीही प्रशासन ही समस्या गांभीर्याने घेत नाही. दुधिवरे खिंडीतून कोसळणाऱ्या दगडीमुळे पावसाळ्यात पवन मावळ आणि लोणावळा यांचा संपर्क तुटतो. खिंडीत पडणाऱ्या दगडी ही नागरिकांना स्वतः बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा लागतो.

सार्वजनिक बांधकाम विभागाने खिंडीतील सैल झालेले दगड, दरडी हटवून खिंड रुंद केल्यास तसेच रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे लावल्यास संभाव्य धोका वेळेत टाळता येईल. बऱ्याच वर्षांपासून खिंडीतील दरड संकट दूर करण्यासह रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे तसेच खिंडीच्या रुंदीकरणाची मागणी स्थानिक करत आहोत. मात्र, पीडब्लूडी फक्त आश्वासन देत आहे. मोठी जीवितहानी झाल्यावरच प्रशासन लक्ष देईल, असे वाटत आहे. कोणत्याही क्षणी दरड कोसळेल याची भीती स्थानिकांना असते. दरडीचा धोका दूर करण्यासाठी तसेच खिंडीच्या रुंदीकरणासाठी व दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम व वनविभाग प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. प्रशासनाने दुर्घटनेची वाट न पाहता उपाययोजना राबवून संभाव्य संकट दूर करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.