Bhosari News: अतिक्रमणांमुळे अंकुशराव लांडगे नाट्यगृहाला बकाल स्वरूप

नाट्यगृहाच्या प्रवेद्वाराजवळच थाटली दुकाने

एमपीसी न्यूज – भोसरी गावजत्रा मैदानाच्या बाजूला असलेल्या अंकुशराव लांडगे नाट्यगृहाला अतिक्रमणांमुळे बकाल स्वरूप आले आहे. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापासून रस्त्यापर्यंतचा भाग  भाजी, फळे, खाद्यपदार्थ यासह इतर वस्तू विक्रेत्यांनी व्यापला आहे. त्यामुळे या परिसरात संध्याकाळी वाहनांची नेहमीच गर्दी असते. मात्र, महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणांकडे काणाडोळा करण्यात येत असल्यामुळे या भागातील वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे.

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराला अगदी खेटून खाद्यपदार्थ , मासळी विक्रेते, फळ आणि शहाळे विक्रेत्यांनी गाड्या लावल्या आहेत. या अतिक्रमणांना राजकीय पाठबळ असल्याचे उघड गुपित आहे. नाट्यगृहाच्या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशा तक्रारी येथे येणारे रंगकर्मी , प्रेक्षक यांच्याकडून करण्यात आल्यानंतर तेथे जुजबी कारवाई करण्यात येते.

कारवाई झाल्यानंतर पुन्हा एक ते दोन दिवसांत अतिक्रमण विभागाकडे दंडाची रक्कम भरून गाड्या सोडवून आणल्या जातात आणि पुन्हा तेच बकाल चित्र दिसू लागते. त्यामुळे या चौकात सकाळी आणि संध्याकाळी नेहमीच वाहनांची कोंडी झालेली असते. या भागातील रस्त्यांची रुंदी वाढवूनही रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळे पुन्हा “जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.