Paud Crime News : प्रेम संबंधास अडथळा ठरणा-या तरुणाचा खून करून मृतदेह शेतात पुरला

एमपीसी न्यूज – प्रेम संबंधासाठी अडथळा ठरणा-या एका तरुणाचा लोखंडी रॉडने मारून दोघांनी खून केला. त्यानंतर मयत तरुणाचा मृतदेह शेतातील झाडाझुडूपात खड्डा खणून पुरून पुरावा नष्ट केला. हा धक्कादायक प्रकार नोव्हेंबर 2019 मध्ये मुळशी तालुक्यातील जातेडे गावात घडला.

गजानन इडोळे (वय 23) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. योगेश विलास इडोळे, ओम मुटकुळे या दोघांच्या विरोधात 10 ऑक्टोबर 2021 रोजी पौड पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम एस गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी योगेश याचे जान्हवी घेघाटे नावाच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. मयत गजानन याला हे प्रेमप्रकरण माहित होते. त्यांच्या प्रेम संबंधामध्ये मयत गजानन अडथळा ठरत होता. गजानन हा आरोपी योगेश याला त्रास देत असे.

याच कारणावरून आरोपी योगेश आणि ओम या दोघांनी मिळून स्प्रिंकलरच्या रॉडने गजाननच्या डोक्यात घाव घालून त्याचा खून केला. त्यानंतर गजाननचा मृतदेह मुळशी तालुक्यातील जातेडे गावातील सतीश कदम यांच्या शेतावर झाडाझुडूपात खड्डा खणून त्यात पुरून टाकला. मात्र, ही प्रकरण सुमारे दोन वर्षांनी उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पौड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.