Akurdi News: ‘डीवायपीआययू’तर्फे दिव्यांग मुलांना मिळणार मदतीचा ’हात’

एमपीसी न्यूज – नैसर्गिक आपत्तीच्या कारणांनी हात नसलेल्या तसेच अपघातात हात वा हातांची बोटे गमावलेल्या दिव्यांग लहान मुलांसाठी डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे (डीवायपीआययू) पुढाकार घेण्यात आला आहे. ‘डीवायपीआययू’च्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील प्रयोगशाळेत जैवतंत्रज्ञानाच्या आणि रोबोटिक्स अभियांत्रिकीच्या मदतीने कृत्रिम हातांची निर्मिती केली असून, हे कृत्रिम हात दिव्यांग मुलांसाठी विद्यापीठातर्फे विनामूल्य वितरित करण्यात येणार आहेत.

‘डीवायपीआययू’चे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन व विद्यापीठातील इतर प्राध्यापकांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाची माहिती बुधवारी देण्यात आली. यावेळी विद्यापीठातील जैव अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख व या उपक्रमाच्या मार्गदर्शक डॉ. सुरभी सोनम तसेच कृत्रिम हातांची निर्मिती करणाऱ्या चमूतील विद्यार्थी आकांक्षा खांडगे, वैष्णवी सैद, वैष्णवी रमणी, प्रीतम वणवे व सृष्टी चव्हाण यांनी या महत्त्वाकांक्षी निर्मितीविषयी माहिती दिली. हा उपक्रम ‘ई-नेबल’ नावाच्या जागतिक पातळीवरील ऑनलाइन सामाजिक चळवळीच्या मदतीने अधिक व्यापक केला जाणार आहे.

कुलगुरू प्रा. रंजन या वेळी म्हणाले, ‘विद्यापीठातील अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवाही विकसित व्हाव्यात, हा आमचा प्रयत्न असतो. ‘डीवायपीआययू’तर्फे सुरु करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान सामाजिक सबलीकरणासाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. आम्ही या प्रयोगात लवकरच पुढचा टप्पा गाठून अशा कृत्रिम हातांचा उपयोग अधिकाधिक दिव्यांगांपर्यंत पोचवण्याचा आमचा मानस आहे.’

डॉ. सोनम या प्रयोगाविषयी म्हणाल्या, ‘थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही हे कृत्रिम हात बनविले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सबलीकरणासाठी कृत्रिम हातांच्या निर्मितीचा हा प्रकल्प आम्ही काही आठवड्यांपूर्वी सुरु केला. यात पर्यावरणपूरक पॉलिमरचा उपयोग करण्यात आला आहे. या हातांचे वितरण आर्थिक दुर्बल गटातील तसेच गरजू मुलांना विनामूल्य करण्यात येईल.’

दरम्यान, ‘डीवायपीआययू’चे कुलगुरू यांनी या वेळी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त यंदापासून दिल्या जाणाऱ्या सहा पुरस्कारांची घोषणाही केली. सर्वाधिक सर्वसमावेशक शाळा, शिक्षणात नवे बदल घडविणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती , समाजाच्या विविध समुदायांपर्यंत पोचणाऱ्या सर्वोत्तम संस्था, सर्वोत्तम भविष्यकेंद्री शाळा, सर्वोत्तम अध्ययनकेंद्री शाळा आणि नैसर्गिक प्रतिभेची देणगी लाभलेल्या विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारी सर्वोत्तम शाळा या सहा विभागांत यंदापासून दरवर्षी ‘डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संवर्धन पुरस्कार’ प्रदान केला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.