Pimpri News : इलेक्ट्रिक वाहने सांभाळणे झाले कठीण; वाहन धारकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

एमपीसी न्यूज – इंधनदरवाढ होत असल्याने अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्मितीकडे वळल्या आहेत. मात्र अजूनही इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणा-या मूलभूत सोयी सर्वत्र उपलब्ध नसल्याने वाहन धारकांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सोसायटीकडून पार्किंगमध्ये चार्जिंग पॉईंट काढून दिला जात नाही. दोन ते तीन मजल्यापर्यंत राहणारे काहीजण वायर अंथरून चार्जिंगची तात्पुरती सोय करतात. पण त्यापेक्षा उंच इमारतीमध्ये राहत असलेल्या नागिरकांनी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग कशी करायची. करंट बसण्याची, आग लागण्याची भीती असल्याचे सोसायटीकडून कारण दिले जाते. सोसायटीच्या पार्किंगमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना असायला हव्यात, असा सूर इलेक्ट्रिक वाहन धारकांमधून उमटत आहे.

मल्टिनॅशनल कंपनीत अभियंता म्हणून काम करणारे आनंद शिंदे म्हणतात, इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे हे वाढत्या इंधन दरवाढीवर चांगला पर्याय आहे. अनेक नागरिक यासाठी पसंती देत आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण देखील होत नाही. ही वाहने पर्यावरणपूरक आहेत. इलेक्ट्रिक वाहनात काही बिघाड झाला. तर ती दाखवायची कुणाला. कारण इलेक्ट्रिक वाहनांची सर्व्हिस सेंटर सर्वत्र उपलब्ध नाहीत. बॅटरी खराब झाली अथवा अन्य कारणामुळे गाडी बंद पडली तर आहे त्याच जागी लावावी लागेल. तिथून ती उचलून अथवा चार्जिंग करून नेल्याशिवाय पर्याय नाही. चार्जिंग होणे शक्य नसेल तर उचलून घेऊन जाणे जिकरीचे होईल.

वैष्णवी हावळे या विद्यार्थिनी आहेत. त्या इलेक्ट्रिक दुचाकी वापरतात. “इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, सर्व्हिस सेंटर, आउटलेट / शोरूम ठिकठिकाणी उपलब्ध व्हायला हवेत. यामुळे लोक आणखी जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करतील. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढल्यास सध्याच्या पेट्रोल पंपांप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन करणे देखील प्रशासनाला व कंपन्यांना सोयीचे होईल, असे वैष्णवी सांगतात.

अरविंद डोंगरे यांनी मागील तीन महिन्यापूर्वी इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली आहे. डोंगरे सांगतात, “चार्जिंगसाठी लागणारा वेळ कमी व्हायला पाहिजे. पॉवर चार्जर असेल तर कमी वेळ लागतो. घरगुती इलेक्ट्रिक पोर्टमध्ये चार्जिंग करताना खूप वेळ जातो. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त आहेत. त्याबाबत विचार व्हायला हवा. किमती कमी झाल्यास अथवा शासनाची सबसिडी वाढल्यास अनेक लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करतील.”

ठलांब अंतरासाठी इलेक्ट्रिक गाडी परवडणारी नाही. ते अंतर वाढायला पाहिजे. चार्जिंग स्टेशनची मागणी केली जात आहे. पण तिथे चार्जिंगसाठी किती दर आकारणार याची अद्याप माहिती नाही. चार्जिंगचे दर पेट्रोल, डिझेलच्या दरापर्यंत जाणार असतील तर इलेक्ट्रिक वाहने परवडणार नाहीत, असे मनोज शिंदे म्हणाले.

बांधकाम व्यावसायिक आकाश कोळेकर म्हणाले, “नवीन तयार होणा-या गृहप्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट बसवण्याचा विचार व्हायला हवा. कारण ती भविष्याची गरज होणार आहे. दुचाकी वाहनांसाठी साधारण प्लग चालू शकेल. मात्र चारचाकी आणि मोठ्या वाहनांसाठी प्रॉपर सोयच असणे आवश्यक आहे.”

कुमार गुप्ता सांगतात, “सिंगल चार्जमध्ये मिनिमम डिस्टन्स पार करते. सिंगल बॅटरी आहे. दुसरी बॅटरी कॅरी करता येत नाही. शहरात लांब अंतरावर जायचे असेल रस्त्यात अनेक ठिकाणी सिग्नल असतील तर चार्जिंग संपणारच आहे. त्यामुळे जेवढे अंतर वाहन जायचे हवे, तेवढे जाणार नाही. यामुळे मी इलेक्ट्रिक बाईक घेऊन 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर जात नाही.”

तळेगाव एमआयडीसी मधील एका कंपनीत एचआर हेड पदावर काम करणारे रोहन काथवटे सांगतात, “माझी कंपनी घरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. मी इलेक्ट्रिक बाईक वापरतो. सुट्टीच्या दिवशी तसेच इतर कामाच्या वेळी बाहेर जाणं होतं. पूर्वीच्या वीजबिलात केवळ 150 रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी बाईक वापरत असताना किमान दोन हजार रुपये पेट्रोलसाठी काढून ठेवावे लागत होते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.