Mahavitran : राज्यात दहा महिन्यात विद्युत वाहनांसाठी विजेच्या विक्रीत तीप्पट वाढ

एमपीसी न्यूज –  राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची (Mahavitran ) विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 महिन्यातील 4.56 दशलक्ष युनिट वरून वाढून जुलै 2023 मध्ये 14.44 दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेशचंद्र यांनी दिली.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची सूचना केली आहे. महावितरण ही महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टीने मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे महावितरणकडून केली जातात.

Vegetable : सफर रानभाज्यांची

राज्यात महावितरणची आणि खासगी अशी एकूण 3 हजार 214 चार्जिंग स्टेशन आहेत. त्या माध्यमातून वाहनांसाठी झालेली विजेची विक्री ध्यानात घेतली तर वेगाने वाढ झालेली दिसते. वाहनांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये राज्यात 4.56  दशलक्ष युनिट विजविक्री झाली होती, मार्च 2023 मध्ये ही विक्री 6.10 दशलक्ष युनिट झाली तर जुलै 2023 मध्ये 14.44 दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली.

राज्यातील विद्युत वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. 2018 साली राज्यात 4 हजार 646 विद्युत वाहनांची विक्री झाली होती तर 2022  साली 1 लाख 89 हजार 698 विद्युत वाहनांची विक्री झाली होती. राज्यात 31 मार्च 2023 अखेर एकूण विद्युत वाहनांची संख्या 2 लाख 98 हजार 838 झाली आहे.

या सुमारे तीन लाख विद्युत वाहनांमध्ये दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाख आहे. विजेवर चालणाऱ्या बसेसची संख्या राज्यात झपाट्याने वाढली आहे. राज्यात 2018 साली केवळ चार विद्युत बसेसची नोंदणी झाली होती. 2022 साली ही संख्या 336 झाली. मार्च 2023 अखेर राज्यात एकूण 1 हजार 399 विद्युत बसेस होत्या.

किफायतशीर प्रवास

विद्युत वाहनांमुळे पर्यावरण रक्षणाला मदत करण्यासोबतच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते. पेट्रोलवर चालणाऱ्या पारंपरिक दुचाकी वाहनाला इंधनाचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे 2 रुपये 12 पैसे येतो तर विद्युत दुचाकीला प्रति किलोमीटर 54 पैसे खर्च येतो.

पेट्रोलियमवर चालणाऱ्या चार चाकी वाहनाला प्रति किलोमीटर सुमारे 7 रुपये 57 पैसे खर्च येतो तर विद्युत चार चाकीला प्रति किलोमीटर 1 रुपया 51 पैसे खर्च येतो. तीनचाकी गाडीचा प्रति किलोमीटरचा खर्चही पेट्रोलियमसाठी सुमारे 3 रुपये 2 पैसे तर विजेसाठी 59 पैसे ( Mahavitran) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.