Pune : पुणेकरांना मेट्रोची माहिती देण्यासाठी संभाजी उद्यानात मेट्रो माहिती केंद्रांची उभारणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो प्रकल्पाची माहिती पुणेकरांना मिळावी यासाठी मेट्रोच्या डब्यात मेट्रो माहिती केंद्र साकारण्यात येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या संभाजी उद्यानाजवळील दोन गुंठे जागेत काम सुरु करण्यात आले आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत हे माहिती केंद्र नागरिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवरील मेट्रोची कामे वेगाने सुरु आहेत. याची माहिती नागरिकांना मिळावी यादृष्टीने हे माहिती केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात जागा मिळावी अशी मागणी मेट्रोच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. तत्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी संभाजी उद्यानातील दोन गुंठे जागा तीन वर्षाच्या कराराने मेट्रोला देण्यास मान्यता दिली होती. त्याच जागेवर हे माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या पोलीस चौकीच्या मागे या माहिती केंद्राच्या उभारणीला सुरवात करण्यात आली आहे. मेट्रोच्या डब्याच्या आकारात उभारल्या जाणा-या या माहिती केंद्रात मेट्रोविषयक माहिती व्हिडीओ, ऑडीओच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये मेट्रोच्या डब्याप्रमाणे आसन व्यवस्था, सरकते दरवाजे, आणि 25 डिग्री तापमान राखणारी व्यवस्था असणार आहे, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.