Pcmc Elecation 2022 : आरक्षण सोडतीत माजी महापौर, गटनेत्यांना धक्का; मावळत्या महापौर, सभागृह, विरोधी पक्षनेत्यांना संधी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमध्ये आजी-माजी दिग्गजांना फटका बसला आहे. माजी महापौर योगेश बहल, उपमहापौर केशव घोळवे, मावळत्या सभागृहातील शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे यांची संधी गेली आहे. तर, अनेकांना पुन्हा सभागृहात येण्याचा मार्ग आरक्षणातून खुला झाला आहे. आरक्षण सोडत निघताच इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

आगामी निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज (शुक्रवारी) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढण्यात आली. आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत काढलेल्या सोडतीला अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, उपायुक्त विठ्ठल जोशी, सचिन ढोले उपस्थित होते. नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी/ ओबीसीं) करिता 37 आणि सर्वसाधारण महिलांच्या 38 जागांसाठी सोडत काढण्यात आली.   ओबीसींच्या 24 जागा थेटपणे नेमून दिल्या. 13 जागांसाठी सोडत काढली. त्यातील महिलांसाठीच्या 7 जागा थेटपणे दिल्या तर 12 जागांसाठी सोडत काढली. सर्वसाधारण महिलांसाठी 31 जागा थेटपणे दिल्या. 7 जागांसाठी सोडत काढली.

 

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे अन् शहांमध्ये चर्चा; 60-40  फार्मुला

 

 

या आरक्षण सोडतीमुळे मावळत्या महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नितीन काळजे, राहुल जाधव, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, विलास मडिगेरी, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर आदींना पुन्हा सभागृहात येण्याची संधी आहे.

तर, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, राहुल भोसले, भाजप नगरसेवक शैलेश मोरे, शितल शिंदे, शशिकांत कदम,  भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, नम्रता लोंढे यांची संधी गेली आहे. आरक्षण सोडतीमुळे योगेश बाबर, अमित बाबर, जगदिश शेट्टी, उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी यांचीही संधी हुकली आहे.

 

 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांना हक्कांचा मतदार असलेला प्रभाग सोडून दुस-या प्रभागातून लढावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे नाना काटे आणि भाजपचे बापू काटे यांना प्रभाग बदलावा लागेल किंवा आमने-सामने लढावे लागेल. सर्वसाधारण एकच जागा असल्याने प्रशांत शितोळे-अतुल शितोळे यांना आमने-सामने लढावे लागणार आहे. काही नगरसेवकांवर प्रभाग बदलण्याची वेळ येणार आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांना आमने-सामने लढावे लागणार आहे. सध्या एकाच पक्षात असलेल्या नगरसेवकांचा आमने-सामने होईल अशी परिस्थिती आहे.

 

सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार

आरक्षण सोडतीत अनेक विद्यमान नगरसेवकांना धक्का बसला आहे. महिलांसाठी आरक्षण पडले आहे. हक्काचा मतदार असलेल्या प्रभागात आरक्षण पडल्याने अडचण झाली. बाजूच्या प्रभागात लढण्याचे धाडस करणे कठिण आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांच्यासह अनेक नगरसवेकांना सौभाग्यवती किंवा मातोश्रीला निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.