MPC Exclusive Interview: भाजपच्या दोन आमदारांनी शहरासाठी काय केलं?, नाना काटे यांचा सवाल

लॉकडाऊन कालावधीत राज्य सरकारकडून आलेले धान्य भाजपचे पदाधिकारी स्वतःच्या बॅनरखाली वाटप करत होते. त्याची अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांना तक्रार करून भाजपचा डाव उधळून लावला.

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – भाजपने साडेतीन वर्षांत शहरात काहीच विकासकामे केली नाहीत. जनतेच्या हिताची केवळ दहा टक्के तर स्वहिताची 90 टक्के कामे केली आहेत. भाजपच्या दोन आमदारांनी शहरासाठी काहीच केले नाही. हे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील जनता पाहत आहे. मास्क खरेदीत देखील भ्रष्टाचार झाला. कोरोनाच्या महामारीत देखील भाजपने पैसे खाल्ल्याचा आरोप मावळते विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केला आहे. येणाऱ्या काळात पालिकेत नक्कीच सत्ताबदल होईल. अजितदादांचे नियोजन चालले आहे. ते येणाऱ्या काळात दिसेल. दादांनी दुर्लक्ष केलंय, शहरात येत नाहीत असे काही लोकांना वाटते. पण, ही वादळापूर्वीची शांतता आहे लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पक्षाने ठरवून दिलेला एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे बुधवारी (दि.2) राजीनामा दिला आहे. त्यांच्या वर्षभरातील कामकाजाबाबत ‘एमपीसी न्यूज’चे प्रतिनिधी गणेश यादव यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न: वर्षभरात कोणती चुकीची कामे बाहेर काढली?

उत्तर:- पालिकेत विरोधाला विरोध केला नाही. जनतेच्या हिताच्या कामांना पाठिंबा दिला. चुकीच्या कामांना तीव्र विरोध केला. आम्ही विरोध केल्यानंतरही भाजपने बहुमताच्या जोरावर कामे मंजूर करून घेतली आहेत. मनमानी पध्दतीने कारभार सुरू आहे. अर्थसंकल्पावर देखील चर्चा करू दिली जात नाही. पाच मिनिटांत अर्थसंकल्प मंजूर केला जातो.

विषयावर बोलू दिले गेले नाही. लॉकडाऊन कालावधीत राज्य सरकारकडून आलेले धान्य भाजपचे पदाधिकारी स्वतःच्या बॅनरखाली वाटप करत होते. त्याची अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांना तक्रार करून भाजपचा डाव उधळून लावला. नागरिकांना थेटपणे अन्नधान्य मिळवून दिले.

पाण्याच्या प्रश्नांवर आवाज उठविला. भाजपने तीन वर्षांत काहीच विकासकामे केली नाहीत. मास्क खरेदीत देखील भ्रष्टाचार झाला आहे. कोरोनाच्या महामारीत देखील भाजपने पैसे खाल्ले आहेत. भाजपच्या दोन आमदारांनी शहरासाठी काहीच केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली केलेली विकास कामे नागरिकांना आज देखील आठवतात. काम करणारे कोण आहेत. हे शहरवासीयांच्या लक्षात आले आहे.

प्रश्न: तुम्ही सत्ताधाऱ्यांवर टीका केल्यावर तुमच्यावर वैयक्तिक हल्ला झाला का, राजकीय सामंजस्य होते का?

उत्तर- नाही. भाजप सत्ताधारी आणि आम्ही विरोधात आहोत. सभागृहात जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणे आमचे कर्तव्य आहे. वैयक्तिक हेवेदावे नसतात. परंतु, सत्तेच्या जोरावर किती उतमात करावा याला पण एक प्रमाण असते. सत्ताधारी म्हणून त्यांनी जनतेच्या हिताची कामे करणे आवश्यक होते. पण, भाजपने जनतेच्या हिताची केवळ दहा टक्के तर स्वहिताची 90 टक्के कामे केली आहेत. हे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर पाहत आहे.

प्रश्न: महापौर उषा ढोरे यांच्याबाबतचा सभागृहातील अनुभव कसा आहे?

उत्तर:- महापौर सभागृहात बोलू देतात. पण, पालिकेत सगळे बाहुले झाले आहेत. प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या रिमोटवर चालतो. मग महापौर असो की सभागृह नेते असोत. रिमोट कंट्रोलवर चालतात. त्यांना रिमोट करणारे वेगळेच आहेत. त्यांनी पूर्वी राष्ट्रवादीत काम केले आहे. त्यामुळे त्यांनी शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे होता. भाजपच्या नगरसेवकांना देखील बोलू दिले जात नाही. सुरुवातीला नवीन नगरसेवक लिहून दिलेले वाचत होते. आता त्यांच्या देखील लक्षात आले आहे. त्यामुळे ते सभागृहात बोलू लागले असून विरोधी भूमिका देखील घेत आहेत.

प्रश्न: पक्षातील नगरसेवकांची साथ मिळाली का?

उत्तर:- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलाही दुजाभाव नाही. सर्व 38 नगरसेवक, नगरसेविका सोबत होते. सर्वांनी साथ दिली. यापुढे देखील आम्ही सर्वजण एकच राहून काम करणार आहोत. वर्षभरात आमचे सभागृहातील आक्रमक असलेले दत्ताकाका साने, जावेद शेख हे दोन सहकारी कोरोनामुळे गमावले आहेत. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी पक्ष दोन्ही कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

प्रश्न: विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कालावधी पुरेसा आहे का?

उत्तर:- विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यभार स्वीकारला आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. त्यानंतर दोन महिने मी आजारी होतो. कोरोना महामारी आली. त्यात सात महिने गेले. त्यामुळे जास्त काम करण्यास संधी मिळाली नाही.

अडीच-अडीच असे पाच वर्षात दोन विरोधी पक्षनेते व्हायला पाहिजे होते. परंतु, एकच पद असल्याने विभागून देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. पाच जणांना संधी मिळावी असे अजितदादांचे धोरण होते. आणखी चार महिने कोरोनात जाणार आहेत. त्यामुळे आता होणारा विरोधी पक्षनेता पालिका निवडणुकीपर्यंत ठेवायला पाहिजे. जेणेकरून त्याला व्यवस्थित काम करत येईल.

प्रश्न: आपण विधानसभेची निवडणूक लढविली आहे. विरोधी पक्षनेतेपदी काम केल्याचा फायदा होईल का?

उत्तर:- आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात जबाबदार पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. भविष्यात नक्कीच त्याचा फायदा होईल.

प्रश्न: अजितदादांनी भाजपसोबत जावून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा पालिकेत पण सत्तेत सहभागी होऊ असे वाटले होते का?

उत्तर:- अजितदादा जो निर्णय घेतील. तो आमच्यासाठी अंतिम आहे. आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहोत. त्यामुळे नक्कीच वाटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून दादांना आम्ही सर्वस्व मानले आहे. जिथे दादा असतील तिथे आम्ही असणार आहोत. त्यात काही वाद नाही. येणाऱ्या काळात पालिकेत नक्कीच सत्ताबदल होईल. दादांचे नियोजन चालले आहे. ते येणाऱ्या काळात दिसेल. दादांनी दुर्लक्ष केलेय, शहरात येत नाहीत असे काही लोकांना वाटते. पण, ही वादळापूर्वीची शांतता आहे लक्षात ठेवावे.

प्रश्न: अजितदादांचा पूर्ण पाठिंबा मिळाला का?

उत्तर:- वर्षभर दादांचा पूर्ण पाठिंबा होता. पद तुम्हाला दिले आहे. जिथे जनतेच्या हिताविरोधात काम होत असेल तिथे आवाज उठवा. तुमच्या पदाचा वापर व्यवस्थितपणे करा असे सांगितले होते. काम करण्यास पूर्ण मोकळीक दिली होती.

प्रश्न: तुमचा वारसदार कोण असेल?

उत्तर:- विरोधी पक्षनेतेपदासाठी अनेकजण सक्षम आहेत. त्यातील पाच जण इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. ते योग्य निर्णय घेतील. दादा ज्याला जबाबदारी देतील. त्याला आम्ही साथ देणार आहोत. त्याच्या नेतृत्वात एकजुटीने काम करणार आहोत. सभागृहात चुकीच्या कामाला कडाडून विरोध केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III