Mumbai News : कोरोनाची दुसरी लाट नव्हे, त्सुनामी येईल अशी भीती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – आतापर्यंत नागरिकांनी चांगलं सहकार्य केलं तसचं पुढं करा, कोरोना गेलेला नाही. त्यामुळे दुसरी लाट नव्हे तर त्सुनामी येईल, अशी भीती वाटत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे आपण आधीच काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर आपल्यालाही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. पाडव्याला राज्यातील सर्व धर्मांची प्रार्थना स्थळे उघडली मात्र याठिकाणी गर्दी न करण्याचे तसेच, येणाऱ्या कार्तिकी यात्रेला गर्दी न करता भक्तीभावाने एकदशी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आतापर्यंत आपण सर्व सण संयमाने साजरे केले. उत्तर भारतीय बांधवांनी छट पूजा कुठेही गर्दी न करता साजरा केली. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे फुगत चाललेला कोरोनाचा आकडा खाली आला येण्यास मदत झाली. मात्र, सगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका. दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. परदेशात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे गर्दी वाढली तरी कोरोना मरणार नाही तर, तो वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना जास्त घातक आहे. तरुणांपासून वुद्धांना या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सर्वांनाच त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

लसीकरणाबाबत अजून सर्व अंधातरी आहे.
24 ते 25 कोटी जनतेला लसीकरण करायची गरज आहे. लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्चित झालेले नाही. जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांवर टोला लगावला. अनावश्यक घराबाहेर पडू नका, कोरोनाची लक्षण दिसली तर लगेच चाचणी करा असे, कळकळीची विनंती त्यांनी केली.

लस येईल तेव्हा येईल, कोरोनापासून जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहा. गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी जाण्याचं टाळा, मास्क परिधान करायचे विसरु नका, हात धुवत रहा, योग्य अंतर पाळा हेच कोरोना टाळण्याचे उपाय आहेत असे, उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.