Rahatani News : रहाटणी फाट्यावरील फर्निचर दुकानाला आग, फर्निचर जळून खाक

एमपीसी न्यूज – रहाटणी फाट्यावरील फर्निचर दुकानाला भीषण आग लागली या आगीत दुकानाच्या वरच्या मजल्यावरील सर्व फर्निचर जळून खाक झाले आहे. आज (मंगळवार, दि.15) दुपारी एकच्या सुमारास हरियाली फर्निचर दुकानात ही घटना घडली. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले व एका तासात जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

याबाबत अधिकची माहिती अशी की, आज दुपारी एकच्या सुमारास रहाटणी फाटा येथील हरियाली फर्निचर ॲन्ड इलेक्ट्रॉनिक या दुकानाच्या वरच्या मजल्यावर भीषण आग लागली. या मजल्यावर मोठ्या प्रमाणात डायनिंग टेबल, सोफा सेट, कपाट, बेड, गाद्या असे साहित्य होते‌. गाद्या, उशी, बेडशीट व लाकडी फर्निचर असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन एक तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. पण, येथील साहित्य मात्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीचे मुख्य कारण अद्याप समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.