शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Ajit Pawar: अजितदादांच्या पुलाच्या पाहणी दौऱ्यावरून भाजप-राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांमध्ये जुंपली!

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने बोपखेलवासियांसाठी मुळा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी पाहणी करणार होते. परंतु, रात्री उशिरा अचानक त्यांचा दौरा रद्द झाला. अजितदादांच्या पाहणी दौऱ्यावरून मात्र स्थानिक भाजप – राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांमध्ये जुंपली आहे.

महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून 20 वर्षे बोपखेलला विकासकामांपासून वंचित ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर चमकोगिरी सुरू केली आहे. वास्तविक, भाजपाने केलेल्या विकासकामांची पाहणी करुन राजकीय श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे, अशी टीका भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी केली.  शहरातील विकासकामांची पाहणी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) करीत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून भाजपानेच मंजुर केलेली आणि सुरू केलेली कामे पाहणीचा दौरा आखला जातो. महापालिकेत प्रशासक राजवट लागू झाली असल्यामुळे त्याआडून राष्ट्रवादी आगामी निवडणुकीसाठीचा छुपा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

Supriya Sule : अमिताभ बच्चन का पिक्चर भी, कभी कभी फ्लॉप होता है, राज्यसभा निकालानंतर सुप्रिया सुळे यांची डायलॉगबाजी

महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून बोपखेलवर राष्ट्रवादीकडून अन्याय झाला. एकाही महत्त्वाचा प्रकल्प बोपखेलमध्ये झाला नाही. भाजपाच्या पाच वर्षांच्या काळात उड्डाणपुल, संरक्षण विभागाच्या हद्दीतील रस्ते, बहुउद्देशीय इमारत, कर संकलन कार्यालय, जलवाहिनी, पाणी प्रश्न, उद्यान विकसित करण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला. गेल्या 20 वर्षांत जी कामे राष्ट्रवादीने केली नाही, तेवढी पाच वर्षांत भाजपाने केली. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी प्रशासकाच्या आडून श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही डोळस यांनी म्हटले होते.

त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी चंद्रकांत वाळके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, भाजप नेत्यांच्या करंटेपणामुळेच दापोडी बोपखेल रस्ता बंद झाला. नविन पुलावरून पाच किलोमीटर खडकीला वळसा हे बोपखेलवासियांवर आयुष्यभरासाठी अनावश्यक दुखणे लादले गेले. महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून पिंपरीला येण्यासाठी सीएमई हद्दीतून बोपखेलवासियांसाठी दापोडी मार्गे जुना रस्ता होता. मात्र केंद्रांत सत्तेत आल्यानंतर भाजपच्या संरक्षण मंत्र्यांनी हा जूना रस्ता कायमचा बंद केला. बोपखेल पाकिस्तानमध्ये असल्यासारखी अत्यंत हिन वागणूक बोपखेलच्या नागरिकांना देण्यात आली. हा रस्ता बंद केल्यामुळे नविन पुलावरून पाच किलोमीटर खडकीला वळसा घालून आता नागरिकांना दापोडी, पिंपरीला यावे लागणार आहे. गल्ली ते दिल्ली भाजपाच्या हातात सत्ता असताना हा प्रश्न त्यांना सोडविता आला नाही, ही त्यांची नामुष्की आहे. केवळ भाजपच्या करंटेपणामुळेच बोपखेलवासीयांवर आयुष्यभरासाठी हे अनावश्यक दुखणे लादले गेल्याचा आरोप वाळके यांनी केला आहे.

भाजपाचा संरक्षणमंत्री असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांना रस्त्याचा प्रश्न सोडविता आला नाही. एकाही स्थानिक नेत्याने त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. रस्त्याचा प्रश्न सोडवू न शकलेले भाजपनेते नव्याने उभारलेल्या पुलाचे श्रेय लाटत आहेत, हे शहरवासियांचे दुर्देव असल्याचेही वाळके म्हणाले.

 

 

 

 

 

वस्तुत: या पुलामुळे बोपखेलवासियांना नाहक त्रास होणार आहे. पिंपरीकडे येण्यासाठी येथील नागरिकांना या पुलाचा वापर करून खडकी जावे लागणार आहे. व त्यानंतर खडकीला वळसा घालून पिंपरीकडे यावे लागणार आहे. हे आयुष्यभराचे अनावश्यक दुखणे भाजपमुळेच लादले गेले आहे. गेल्या पाच वर्षांत एकही आश्वासन पूर्ण न करणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेत केवळ टक्केवारी, भ्रष्टाचार केला. शहरवासियांवर पाणीटंचाई लादणारे यांचे पदाधिकारी लाचखोरी, खंडणीखोरीसारख्या गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये गेले ही वस्तुस्थिती येथील जनता विसरली नसून बोपखेलच्या नागरिकांवर अन्याय करणार्‍या भाजप नेत्यांना येथील जनता येत्या महापालिका निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही वाळके यांनी व्यक्त केला आहे.

spot_img
Latest news
Related news