Maval Crime News : बनावट खरेदीखत प्रकरणी माजी नगरसेवकाला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

एमपीसी न्यूज – नोटरी कुलमुखत्यारपत्राद्वारे खोटे व बनावट खरेदी दस्त नोंदणी केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने वडगाव मावळ न्यायालयाने तळेगाव दाभाडे येथील वकील असलेल्या एका माजी नगरसेवकाला तीन वर्षे सश्रम कारावास तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे.

तळेगाव दाभाडे येथील राजघराण्यातील सरदार उमाराजे संग्रामसिंह दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपास करून माजी नगरसेवक ॲड. नंदकुमार ज्ञानोबा काळोखे यांच्या विरुद्ध वडगाव मावळ न्यायालयात 2011 मध्ये फौजदारी खटला दाखल केला होता. त्यावर सुनावणी करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भरत बुरांडे यांनी 31 जानेवारीला निकाल दिला.

संबंधित जागा ही गेली 40 वर्षे आपल्या ताब्यात असून वडगाव न्यायालयाच्या या निकालास आपण जिल्हा न्यायालयात आव्हान देणार असल्याचे ॲड. नंदकुमार काळोखे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

तळेगांव दाभाडे येथील सर्व्हे नं. 348/1 ही मिळकत श्रीमती उमाराजे दाभाडे व इतर यांचे वडिलोपार्जित मालकी हक्काची व वहिवाटीची मिळकत होती व आहे. या मिळकती संदर्भात ॲड. नंदकुमार काळोखे यांनी नोटरी कुलमुखत्यारपत्राच्या आधारे खोटे व बनावट खरेदीखत दस्त नोंदणी केल्याचा आरोप करीत श्रीमती उमाराजे दाभाडे यांनी तळेगांव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये अन्वये भा. दं. वि. कलम 420, 467, 478, 471 सह 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एस. बी. होडगर यांनी पूर्ण करून वडगाव मावळ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन साक्षीदार यांची साक्ष नोंदवून न्या. बुरांडे पुणे यांनी आरोपी ॲड. नंदकुमार काळोखे यांना शिक्षा सुनावली.

ॲड. काळोखे यांना कलम 420 अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व रु. 20,000/- दंड, कलम 467 अन्वये एक वर्ष कारावास व रु. 10,000/- दंड, कलम 478 अन्वये एक वर्ष कारावास व रु. 10,000/- दंड तसेच कलम 471 अन्वये एक वर्ष कारावास व रु. 10,000/- दंड आणि फिर्यादी यांना नुकसान भरपाई म्हणून रु. 40,000/- द्यावेत, असे निकालपत्रात म्हटले आहे. या प्रकरणातील दुसरे आरोपी सुधीर मधुकर निरफारके यांना न्यायालयाने निर्दोष मुक्‍त केले आहे .

सदर खटलामध्ये सरकारी वकील म्हणून ॲड. पी. एस. वाळके आणि ॲड. आर. एन. विरकड यांनी तसेच फिर्यादी तर्फे खाजगी वकील ॲड. सचिन बाळासाहेब लोंढे यांनी काम पाहिले. आरोपीतर्फे ॲड. सुशीलकुमार पिसे यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.