Wakad : शासनाने बोगस ठरवल्यानंतरही नाव बदलून पैसे घेऊन बेकायदेशीर पदव्या वाटणा-या संस्थेवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) बोगस ठरवल्यानंतर दोन संस्थांनी नाव बदलून पैसे घेऊन बेकायदेशीर पदव्या वाटण्याचा सपाटा सुरूच ठेवला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. अभिषेक सुभाष हरिदास (वय 37, रा. कोथरूड, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, नीता ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस या दोन संस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, नीता ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस या आरोपी संस्थांना बोगस म्हणून जाहीर केले आहे. विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट ही संस्था दिल्ली येथील आहे. ही संस्था स्वतःला विद्यापीठ म्हणवून घेत आहे. तर पिंपळे निलख येथील नीता ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस ही संस्था या विद्यापीठाचे कॉलेज असल्याचे दाखवत आहे. या दोन्ही संस्थांनी आपसात संगनमत करून नाव बदलून अनधिकृतपणे लोकांकडून पैसे घेऊन पदव्या वाटण्याचे काम केले आहे. याबाबत दोन्ही संस्थांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.