Chakan : मित्राच्या मुलाचे लग्न पडले महागात; विवाहस्थळावरून चोरट्याने पळवली दुचाकी

एमपीसी न्यूज – मित्राच्या मुलाच्या लग्नाला आलेल्या दांपत्याची अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेली. त्यामुळे या दाम्पत्यास मित्राच्या मुलाचे लग्न चांगलेच महागात पडले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी पाच ते सायंकाळी सातच्या सुमारास शेलपिंपळगाव मोहितेवाडी येथील मातोश्री लॉन्स येथे घडली.

काळुराम केशव वाबळे (वय 51, रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाबळे यांच्या मित्राच्या मुलाचे शुक्रवारी शेलपिंपळगाव मोहितेवाडी येथील मातोश्री लॉन्स येथे लग्न होते. या लग्नासाठी वाबळे पत्नीसह त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 / पीयु 1737) गेले. पाच वाजता त्यांनी दुचाकी मातोश्री लॉन्सच्या पार्किंगमध्ये पार्क केली आणि लग्नाला गेले.

लग्न समारंभ संपल्यानंतर सायंकाळी सात वाजता वाबळे लॉन्सच्या पार्किंगमध्ये आले. त्यांची दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली असता दुचाकी मिळाली नाही. अज्ञात चोरट्याने त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.