Article by Vivek Inamdar: ‘काय बी छाप, पण बाबर छाप’, गजानन बाबर यांचा प्रसिद्धीचा गुरुमंत्र

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – माजी खासदार गजानन बाबर यांच्या प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी आणि काही मिनिटांतच आलेली त्यांच्या निधनाची ब्रेकिंग न्यूज देताना भाऊंचं एक वाक्य आठवलं… ‘काय बी छाप, पण बाबर छाप!’ आज त्यांच्या निधनाची बातमी देताना पिंपरी-चिंचवडमधील बाबर पर्व डोळ्यासमोरून सरकलं. राजकारणातून दिवसेंदिवस परमत सहिष्णुता कमी होत चाललेली असताना भाऊंच्या रुपाने एक सहिष्णू नेता काळाच्या पडद्याआड जाणं हे खरोखरच कधीही भरून न येणारं नुकसान आहे, असंच म्हणावं लागेल.

लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारे, शहरातील प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असणारे, महापालिकेचं सभागृह गाजविणारे भाऊ पुढे आमदार आणि खासदार देखील झाले. हा संपूर्ण प्रवास जवळून बघण्याची संधी पत्रकार या नात्यानं मला लाभली. माझ्या सुरुवातीच्या काळात म्हणजे मी पत्रकारितेत नवखा असताना देखील मला कधीही त्यांची भीती वाटली नाही. वयात मोठं अंतर असलं तरी त्यांच्याशी माझी लवकर गट्टी जमली होती. त्याला कारण होते त्यांचा स्वभाव! त्यांची आणि माझी मैत्री ही बातमीच्या पलिकडची होती.

बाबर साहेबांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडायचं. पत्रकारांच्या दृष्टीने ते एक जबरदस्त सोर्स तर होतेच पण अनेक वेळा ते न्यूज मेकर देखील होते. पत्रकारिता करताना काही वेळा बाबर साहेबांच्या विरोधात बातम्या देण्याचाही प्रसंग आला, पण असे प्रसंग ते फार खुबीने हाताळत.

चांगल्या कितीही बातम्या द्या, माणसाच्या लक्षात राहात नाहीत. मात्र विरोधात दिलेली प्रत्येक बातमी तो कधीही विसरत नाही. कोणाच्या विरोधात बातमी दिली तर त्या व्यक्तीची नाराजी, संताप, अबोला अशा स्वाभाविक प्रतिक्रिया उमटतात. काहीजणांची मजल तर धमकी देणे, हल्ला करण्यापर्यंत अगदी सहज पोहचते. काही पत्रकार सहकाऱ्यांना तर जीवाची देखील किंमत मोजावी लागलेली आहे.

याचा आवर्जून उल्लेख करण्याचं कारण म्हणजे भाऊंची मीडिया क्रायसीस हाताळण्याची हातोटी. पत्रकारांशी गप्पा मारताना ते नेहमी एक वाक्य म्हणायचे, ‘काय बी छापा, पण बाबर छापा, बाबर नाव घेतल्याशिवाय तुमची बातमीच पूर्ण होणार नाही.’ Every publicity is Good Publicity हा त्यांचा प्रसिद्धीझोतात राहण्याचा यशस्वी फंडा होता. विरोधात बातमी दिली म्हणून ते कोणत्या पत्रकारावर चिडल्याचं मी कधीही पाहिलं नाही. उलट दोन्ही हात जोडून हसतमुखाने त्या पत्रकाराला सर्वांसमक्ष ‘धन्यवाद’ म्हणणारे बाबर साहेब मी अनेकवेळा अनुभवले आहेत.

विरोधी पक्षात राहून देखील सत्ताधाऱ्यांशी त्यांचे संबंध चांगले असायचे. सभागृहात सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे बाबर साहेब सभागृहाबाहेर त्याच सत्ताधाऱ्यांशी गप्पा मारताना हास्यविनोदात रमून जात. त्यांच्या याच पक्षातीत मैत्रीचा त्यांना राजकारणात आमदार, खासदार अशा पायऱ्या चढताना निश्चितच उपयोग झाला.

सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारा नेता म्हणजे गजानन बाबर. शहरात कोणतेही आंदोलन असो, भाऊ त्यात सहभागी होणार म्हणजे होणार. एकेकाळी शहरात अशी एकही संघटना नव्हती की ज्याचे अध्यक्ष गजानन बाबर नाहीत. रेशन दुकानदार असोत, बांधकाम व्यावसायिक असोत, उद्योजक असोत की टपरीधारक असोत, सर्व संघटनांचे अध्यक्ष गजानन बाबर!

कधीही हाक मारली तर हजर होणारा हक्काचा माणूस म्हणून भाऊंकडे पाहिले जायचे. भाऊंनी सार्वजनिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिले, पण कधीही खचले नाहीत. शेवटपर्यंत कार्यमग्न राहिले. लोकांसाठी लढत राहिले. म्हणूनच आपला हक्काचा माणूस गेल्याची भावना व्यक्त करीत पिंपरी-चिंचवडकर हळहळत आहेत. भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.