Pune : स्टॉल स्थलांतरासाठी दीड महिन्यांची मुदत द्यावी ; स्टॉलधारकांची मागणी 

एमपीसी न्यूज – स्वारगेट येथील महामेट्रोच्या कामासाठी सातारा रस्ता आणि सिंहगड रस्त्याच्या बाजूला असलेले 61 अधिकृत स्टॉल सोमवारी लक्ष्मी नारायण चौकात स्थलांतरीत केले जाणार आहेत. मात्र, ऐन सणासुदीत महापालिकेने ही कारवाई केल्यास सर्व स्टॉलधारकांचे मोठे नुकसान होणार असल्याने स्टॉल स्थलांतरासाठी दीड महिन्यांची मुदत द्यावी, त्यानंतर स्टॉलधारक स्वतः पुनर्वसनाच्या जागेवर जाण्यास तयार असल्याची माहिती शांतीदूत राजीव स्वारगेट कॉर्नर स्टॉलधारक संघटनेने केली आहे. 

गेल्या दीड वर्षांत स्टॉलचे तीन वेळा स्थलांतर झाले आहे. त्यामुळे स्टॉल मोडकळीस आले आहेत, त्यातच ज्या ठिकाणी स्थलांतर करायचे आहे त्या ठिकाणी सोय नाही, तसेच जागेची निश्चितीही पाणी, लाईट तसेच ड्रेनेजची कोणतीही करण्यात आलेली नाही; अशा स्थितीत पालिकेने तातडीने कारवाई करू नये, अशी मागणीही संघटनेचे सचिव राजेंद्र कदम यांनी केली आहे.

कदम म्हणाले, कोणत्याही विकासकामास आमचा विरोध नाही. त्यात आम्ही कोणतेही अडथळे आणणार नाही. मात्र येत्या महिन्याभरात नवरात्र आणि दिवाळी आहे. या कालावधीत स्टॉल इतरत्र हलविल्यास त्याचा व्यवसायावर परिणाम होऊन आमच्या कुटुंबांना फटका बसेल, आम्ही स्वतः स्थलांतरास तयार आहोत. मात्र, त्यासाठी आम्हाला एक ते दीड महिना मुदत मिळावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.