Maharashtra News : शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल, सुमारे सहा हजार पदे भरणार

एमपीसी न्यूज : राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रिया सुरू होत आहे.

राज्यात डिसेंबर, 2017 मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12 हजार 70 शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 5 हजार 970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, 2020 मध्ये पूर्ण झाली आहे.

कोविडच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असे आदेश वित्त विभागाने जारी केले होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया प्रलंबित होती.

पण शिक्षकांची पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त होती. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पदभरतीच्या बंदीतून ‘पवित्र’ प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात यावी यासाठी वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे शिक्षण सेवक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.