Weather update : कोकणात आज तर 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

एमपीसी न्यूज : राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. आज कोकणात तर 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. चातकाप्रमाणे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत होता.

येत्या २४ तासात मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार तर, काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १० जुलैपासून राज्यातील पाऊसमान वाढण्याची चिन्हे आहेत. येत्या १० ते १२ जुलैदरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला.

१२ जुलैला कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्यात ‘ऑरेंट अलर्ट’ दिला असून घाट विभागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनसाठीचे हवामान अनुकूल झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि हवेच्या वरील स्तरात अनुकूल असलेले हवामान यामुळे महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसांत चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणक्षेत्रातही पावसाचा जोर होता.
मराठवाडा : परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. अहमदनगर शहरासह श्रीगोंदा, जामखेड, अकोले तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.