Gurupaurnima : गुरु हे एक तत्व आहे; या तत्वाचे पूजन होणे आवश्यक आहे!

एमपीसी न्यूज : आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही ‘गुरुपौर्णिमा’ (Gurupaurnima) म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करावी ही परंपरा  नक्की कधीपासून सुरु झाली याची निश्चित माहिती आज उपलब्ध नाही. 

अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः

आपल्या गुरुच्या प्रति कायमच कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतीय उपखंडात वेदकाळा पासूनच आहे.
‘गुरु-दक्षिणा’ देणे हे गुरु- शिष्य परंपरेतील एक महत्वाचे कर्तव्य होते.  ज्या गुरुने आपणांस घडविले ,शिकविले , त्या गुरु विषयीचा आदर -सन्मान व्यक्त करण्यासाठी शिष्य आपल्या गुरुकुलातील शेवटच्या दिवशी आप-आपल्या क्षमते प्रमाणे गुरुदक्षिणा देत असत.

गुरु मात्र ” इदं न मम ”  (हे माझे  नाही ) या वृत्तीने त्या गुरुदक्षिणेचा वापर इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व त्यांचा पालनपोषणांसाठी करीत असत. “गुरुकुल शिक्षणपध्दती” हीच आपली खरी शिक्षण व्यवस्था होती.  प्रत्येक गुरुकुलात एक प्रमुख आचार्य असत जे कुलपती म्हणून त्या गुरुकुलाचा कारभार पहात असत. त्यांनाच गुरुस्थानी समजून त्यांच्या सन्मान केला जाई. तो प्रातिनिधीक सन्मान समस्त गुरुचा असे.

महर्षि व्यासांचा परिचय  हा आपल्याला ‘महाभारतातून’ होतो.  महाभारताचे रचनाकार असलेले व्यास हे स्वत: एक पात्र म्हणून सुद्धा महाभारतात पहावयास मिळतात. तरी सुद्धा त्यांनी महाभारतात स्वत:ला गुरु म्हणून (Gurupaurnima) कोठेही दर्शविले नाही. उलटपक्षी गुरु द्रोण, कृपाचार्य यांचीच गुरु म्हणून महती त्यांनी महाभारतात सांगितली आहे.

‘व्यास पौर्णिमा’ ही ‘गुरुपौर्णिमा’ होण्यास व्यासांनी निर्माण केलेले साहित्यच कारणीभूत आहे. वेद काळात साहित्य हे लिखीत स्वरुपात नव्हते . ते मौखिक परंपरतून पाठांतर करुन जतन केले होते. काळाच्या ओघात हे प्रचंड वेद मानवी क्षमतेमुळे फक्त मौखिक परंपरेतुन जतन करणे अवघड होत होते. त्याचे सुत्रबंध पद्धतीने जतन होण्याची गरज होती. म्हणूनच महर्षी व्यासांनी वेदांचे चार भाग केले जेणेकरून कमी बुद्धिमत्ता आणि कमी स्मरणशक्ती असलेल्यांनाही वेदांचा अभ्यास करता येईल.
व्यासजींनी त्यांची नावे ठेवली – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.

वेदांच्या विभाजनामुळे व्यास हे  ‘वेद व्यास’  या नावाने प्रसिद्ध झाले. वेद व्यासांना पाच मुख्य शिष्य होते. त्यापैकी चार शिष्य  पैल, जैमिन, वैशंपायन आणि सुमंतमुनी. व्यासांनी आपल्या या चार शिष्यांना चार वेद अनुक्रमे शिकविले. त्याच बरोबर आपल्या पाचवा शिष्य ‘रोम हर्षण’ याच्यासाठी त्यांनी 18 पुरणांची रचना केली. गोष्टीरुपाने वेदातील ज्ञान पुराण रुपाने सर्वसामन्य लोकांना उपलबध झाले.

त्यामुळे वेदव्यास हेच सकल हिंदूचे गुरु आहेत. त्यांच्याच मुळे आजचा आपला धर्म आहे. व्यासांचा जन्मा विषयी, त्यांच्या व्यक्तीमत्वाविषयी अनेक मते प्रचलीत आहेत. काही अभ्यासक ‘व्यास’ ही कोणी एक व्यक्ती नसून ते एक पद होते. असे मत सांगतात. त्यामुळे प्रत्येक कालखंडामध्ये कोणीतरी व्यास आढळून येतो असे त्यांचे मत आहे.

ज्या ठिकाणाहून विचार प्रगट केले जातात, त्या ठिकाणास आपण ‘व्यासपीठ’ म्हणतो. प्रत्येक कार्याक्रमाला एक व्यासपीठ आवश्यक असते. व्यासांचा आपल्या जीवनावर किती मोठा प्रभाव आहे हेच यावरुन समजते. महर्षि व्यासांच्या कार्याचे स्मरण आपणांस सतत होण्यासाठी त्यांच्या नावे त्यांच्या जन्म दिनी म्हणजे आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे नामकरण केले गेले आणि आपल्या गुरुला वेदव्यासांचे स्थान देऊन त्यांची पूजा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जावू लागला.

गुरुगीतेमध्ये गुरुचे जे वर्णन केले आहे, त्यात एक प्रसिद्ध श्लोक आहे – 

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

आपल्या आयुष्यात  गुरुचे स्थान हे प्रत्यक्ष् ब्रहमदेव, विष्णु आणी महेश्वर म्हणजे शिव इतकेच महत्वाचे आहे. गुरु आणि त्यांच्यात काहीही अंतर नाही. थोडक्यात गुरुच्या रुपातच हे तीन देव पुजले पाहिजेत असा समज रुढ झाला. या तिन्ही देवांचे एकत्रित स्वरुप म्हणजे ‘श्री दत्त’ त्यामुळे श्रीदत्त हेच गुरुदेव दत्त् म्हणून गुरुपौर्णिमेला गुरु स्वरुपात पुजनिय झाले. त्यातून पुढे विविध अवतार कथा निर्माण झाल्या.

Sharad Pawar : कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी शरद पवार रवाना

श्री दत्तात्रयांनेही आपल्या जीवनात 24 गुरु केले होते. दत्तत्रयांचे 24 गुरु हे आपल्या अवती भवती असणारे सामान्य जीव होते . परंतु, त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखे असते ते आपण अंगीकारले पाहिजे हा धडा देण्यासाठी गुरुदेव दत्तांनी त्यांना त्यांच्या एका गुणसाठी गुरु म्हणून स्वीकारले.

त्या मुळेच व्यासपूजना ऐवजी श्रीगुरुपुजन हे गुरुपौणिमेचे एक आवश्यक अंग बनले आहे. त्या मुळेच दत्तसंप्रदायाच्या विविध संताना दत्ताचा अवतार म्हणून गुरुपुजनाचा विधी केला जातो. त्यात प्रामुख्याने अक्कलकोट स्वामी महाराज, शिर्डीचे साईबाबा, गजानन महाराज यांचे विशेष पूजन केले जाते.

भारतीय उपखंडात अनेक संप्रदाय, पंथ उदयास आले. त्या पैकी बौद्ध, जैन आणि शिख संप्रदायात गुरुशिष्य परंपरा कायम आहे. त्यामुळे त्याही संप्रदायात गुरुचे स्थान विशेष मानले जाते. वारकरी संप्रदायाने गुरुंना सर्वोपरी मानले आहे.  ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरु निवृत्तीनाथांचा उल्लेख विश्वात्मक देव म्हणून करतात. तर संत एकनाथांनी  ‘ओमकार स्वरुपा, सद़गुरुनाथा’ ही प्रसिद्ध रचना केली आहे.

संत तुकाराम महाराजांचा अभंग ‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव’ हा जगविख्यात आहे. प्रत्येक क्षेत्रात आपणांस एक गुरुची आवश्यकता असते. जो ज्ञान देतो तो गुरु इतकीच गुरुची संकुचित व्याख्या आजकाल तयार झाली आहे.

गुरु हे एक तत्व आहे. या गुरुतत्वाचे पूजन या प्रसंगी होणे आवश्यक आहे. आपणही गुरुपौणिमेचे व व्यास जन्माचे हे महत्व जाणून घेऊन आपल्या आयुष्यातील प्रत्येक  गुरुचे महत्व जाणले पाहिजे आणि ‘गुरुविण कोण दाखविल वाट’ हा भाव मनात ठेवून वेगळया पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली पाहिजे.

– अजित दि. देशपांडे, संतविचार अध्यासन 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.