Gurupaurnima : मायारूपी भवसागर तरून जायचे असेल तर सदगुरुंची आवश्यकता

एमपीसी न्यूज : आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे (Gurupaurnima) या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. 

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्।

मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥

गुरूरादिरनादिश्च गुरूः परम दैवतम्।

गुरोः परतंर नास्ति तस्मै श्री गुरवे नमः॥

या अमोलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ अथवा ‘’गुरुपौर्णिमा’ असे म्हणतात. गुरु दोन प्रकारचे असतात एक गुरु ! आणि दुसरे सद्गुरू ! अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की – कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला, की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश, हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो.

ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वत: प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो.  आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू (Gurupaurnima) निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.

Pune News : चौथे गांधी दर्शन शिबिराचे पुण्यात आयोजन

दुसरे म्हणजे सद्गुरू.  गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. ‘गुरुबिन कौन बतायें ‘बाँट ।’हा मायारूपी भवसागर तरून जायचे असेल तर सदगुरुंची आवश्यकता आहे. सद्गुरू ते आहेत जे मोक्ष पर्यंत जाण्याचा मार्ग सांगतात.

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे

मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही

गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सदगुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन कण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल, फेरफार करत नाही. परंतु तो भोग सोयीने (सहजतेने) भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात. भोग भोगताना जी मदत आवश्यक असेल त्याबद्दल मार्गदर्शन करतात. (उदा. पैशाची सोय, मनुष्यबळ, हवी ती व्यक्ती भेटणे.)

आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच  मोक्ष  देणारी काशी, पंढरपूर आहे हे ध्यानात घ्यावे. सर्व तिर्थे तिथे लोळण घेत असतात. देवांचे देव सुद्धा तिथे  वास  करतात . सदगुरुंचा महिमा अपार आहे.

तो ऋषींनाही वर्णन करता आला नाही. त्यांची लीला अगाध आहे. तिथे मुकेही बोलतात, लुळे काम करतात, पांगळे पर्वत चढून जातात. सदगुरु म्हणजे वैराग्याचे मंदिर, शांतीसुखाचे माहेर, शमदमन केलेले, भक्तिज्ञानाची पेठ, शुध्दभाव इ. गोष्टी त्यांचे ठायी असतात. तेव्हा प्रत्येकाने आयुष्यात गुरु किंवा सद्गुरू करावा.  गुरु पौर्णिमेच्या सर्वाना शुभेच्छा !

-डॉ. रिता मदनलाल शेटीया

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.