Pimpri : आरोग्य मित्र ही देवदूतांची फॅक्टरी ठरेल – आनंद पाटील  

आरोग्य मित्र फाउंडेशनच्या पहिल्या तुकडीचा लोकार्पण सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – समाज आणि आरोग्यदायी सेवा यामध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने आरोग्य मित्र फाउंडेशनची सुरुवात झाली आहे. फाउंडेशनचा ‘आरोग्य मित्र’ प्रशिक्षण वर्ग देवदूतांची फॅक्टरी ठरेल, असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी व्यक्त केले.

आरोग्य मित्र फाउंडेशनच्या आरोग्य मित्र प्रशिक्षण वर्गाची सांगता आणि आरोग्य मित्रच्या पहिल्या तुकडीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी या आरोग्य मित्रांना प्रशिक्षण दिले आहे. आरोग्य मित्रचे प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य मित्रांना कार्यक्रमात प्रशस्ती पत्र देण्यात आले. तसेच कार्यक्रमात दुस-या व तिस-या आरोग्य मित्रच्या तुकडीची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, लोकमान्य हॉस्पिटल ट्राॅमाप्रमुख डॉ. अशिष सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी आरोग्य मित्र फौंडेशनचे संचालक मंडळ तसेच डॉ. अभय कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. जयंत श्रीखंडे, निरामय हॉस्पिटलचे डॉ. श्रीरंग गोखले, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, डॉ. वर्षा डांगे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. दिलीप कानडे आदी उपस्थित होते.

आरोग्य मित्र फ़ाउंडेशन या संस्थेचे सर्व पदाधिका-यांचा शपथ विधी सोहळा पार पडला. प्रथम आरोग्य मित्र व आरोग्य मित्र फ़ाउंडेशनचे सचिव कै. अनिल पालकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पहिले आरोग्य मित्र प्रकाश मिर्झापुरे, विठ्ठल बापु सहाणे, ल्क्ष्मण शिंदे, चंद्रकांत पवार, स्वानंद राजपाठ्क, प्रताप घुगे, सुधीर पडाळे, राजेश फ़ुलकर, विजयालक्ष्मी भावसार, मनीषा हिंगणे, गौरव वानखाडे, संदीप संपकाळ, अनंत कुलकर्णी, गणेश वाघचौडे, विजय इंगले यांना त्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षणपूर्ण केल्याबद्द्ल प्रशिस्त पत्रक देउन गौरवण्यात आले. प्रशिक्षण दिवंगत अनिल पालकर यांनी देखील प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नीने प्रशस्तिपत्रक स्वीकारले.

शहरात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ होत आहे. आधुनिक जीवनशैली मुळे हृदय विकारांचे प्रमाण वाढत आहे. प्रदूषण आणि वातावरणाच्या बदलामुळे अनेक साथीचे आजार पसरत आहेत. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण पिढी वेगळ्या मार्गावर जात आहे. या सर्व बाबींमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी एकत्र येऊन ‘आरोग्य मित्र फाउंडेश’ची स्थापना केली आहे. रस्त्यांवर होणा-या अपघातांमध्ये अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने रुग्ण, रुग्णालय आणि डॉक्टर यांच्यामध्ये समन्वयक म्हणून ही संस्था काम करत आहे. ही एक स्वयंसेवी संस्था आहे. आरोग्य विषयक विविध मुद्द्यांवर ही संस्था जनजागृतीचे देखील काम करत आहे.

आनंद पाटील म्हणाले, “समाजातील संवेदनशीलता कमी होत आहे. ही संवेदनशीलता वाढविण्याचे काम आरोग्य मित्र करतील, अशी आशा आहे. अपघातग्रस्त व्यक्तींवर उपचार करणे ही प्रत्येक डॉक्टरांची जबाबदारी आहे. एखाद्या डॉक्टरांनी उपचार करणे नाकारले तर त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल होतो. अपघातग्रस्तांना मदत करणा-यांना पोलिसांकडून विनाकारण त्रास दिल्याचे काही प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतात. पण यापुढे अपघातग्रस्तांना मदत करणा-यांना त्रास दिला जाणार नसल्याची हमी देखील त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत भावसार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.