Pune Rain : पुण्यात संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – पुण्यात आज (दि.16) सकाळपासून संततधार पाऊस असल्याने परिसरातील नद्या, ओढे हे तुडुंब भरून वहात आहेत.त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेने नदीपात्र, ओढे, नाले यांच्यावरूल पुल ओलांडावेत, असे आवाहन पुणे अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे परिसराताल पाणीपुरवठा करणारी धरणे पुर्णक्षमतेने भरली असून त्याद्वारे नदीपात्रात प्रशासनाने विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेत नदी, नाले, ओढे तसेच नदीपाञात प्रवास टाळावा.नदीपाञात असलेली वाहने त्वरीत हलविण्यात यावीत, तसेच जनावरांची देखील काळजी घ्यावी. येत्या काही तासात पावसाचे प्रमाण वाढले असून धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने सर्वांनी खबरदारी बाळगावी,असेही अग्निशमन दलाने सांगितले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, शनिवार, रविवार या तीन दिवसात पुणे आसपासच्या परिसरात वातावरण ढगाळ राहील, तसेच मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या तीन दिवसात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

शहरातील पावसाची परिस्थिती –

1)     मुंढवा जॅकवेल येथील पुलावर पाणी आले असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल आहेत. नागरिकांनी सदर पुलावरून प्रवास टाळावा व प्रशासनास सहकार्य करावे- अग्निशमन दल

2) खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 19 हजार 298 क्युसेक्स विसर्ग वाढवून दुपारी 12 वाजता 22 हजार 880 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी.

3) सकाळी साडे अकरापर्यंतचा पाऊस –  हडपसर -11 मिमी, शिवाजीनगर – 17 मिमी, पाषाण- 17.5 मिमी,तळेगाव- 11 मिमी. तसेच शिवाजीनगर, पाषाण व हडपसर परिसरात  सरासरी ताशी 4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

4) सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात इंटरनेट सेवेचा वेग मंदावला आहे.

5) आज पाऊस संततधार असला तरी येत्या एक ते दोन दिवसात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञानी व्यक्त केली आहे.

 

6) आज सकाळी दहा वाजता मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 13 हजार 200 वरून 15 हजार 840क्युसेक्स करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना धरण प्रशासनाने दिल्या आहेत.

7)  पवना धरणाच्या सांडव्या द्वारे आज   दुपारी एक वाजता 4 हजार 200 क्युसेक  वाढवुन 6 हजार 400 क्युसेक व पावर आऊटलेट 1 हजार 400 असे एकुण 7 हजार 800 क्युसेक करण्यात येणार आहे तरी नदी तिरा कडील गावातील रहिवाशांनी सतर्क रहावे.
पाणलोट क्षेत्रात पडणारा  पाऊस व धरणे येणारा येवा यांचे  प्रमाण बघुन धरणातून सोडलेला विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.