Hinjawadi News : पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना कारमध्ये बसवून लुटणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पुणे येथून मुंबईकडे खाजगी पॅसेंजर कारने जाणाऱ्या प्रवाशांना दमदाटी करून, शस्त्राचा धाक दाखवून लुटणा-या दोन चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. 80 सीसीटीव्ही कॅमेरे तपासत पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. 

 

किरण भरत साळुंके (वय 23), समाधान आण्णा शेटे (वय 21, दोघे रा. मुपो नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

सुमेध नारायण गुरव (वय 32, रा. मोहनवाडी, खोपोली, ता. खालापुर जि. रायगड) हे 27 मे रोजी हिंजवडी येथील त्यांच्या कंपनीतील काम संपवून नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी खोपोली येथे जाण्यासाठी शनी मंदीर, वाकड येथे बंगलोर मुंबई हायवेवर गाडीची वाट पहात थांबले. त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची ब्रेझा कार येवून त्यातील दोन इसमांनी गुरव यांच्याकडून भाडे घेवून खोपोली येथे सोडण्याचे बहाण्याने गाडीत बसवले.

 

सायंकाळी साडेसहा ते सव्वासातच्या दरम्यान चालकाच्या सांगण्यावरून त्याच्या शेजारी बसलेल्या इसमाने गुरव यांच्याकडून कॉल करण्यासाठी मोबाईल फोन घेतला. त्यातील सिमकार्ड काढून ते गुरव यांना देवून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल फोन जबरदस्तीने चोरला आणि गुरव यांना पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिरगाव येथे सोडून दिले.

 

अशाच प्रकारची आणखी एक घटना 30 मे रोजी या परिसरात घडली. दत्तात्रय काशिनाथ टिचगे (वय 32, रा. मोशी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. टिचगे त्यांच्या ठाणे येथील बहिणीकडे जात होते. ते वाकड ब्रिज येथून एका लाल रंगाच्या काळ्या काचा असलेल्या कारमध्ये बसले. कार वाकड ब्रिजवरून मुंबईच्या दिशेने पुणे – मुंबई द्रुतगती मार्गाने जात असताना कारमधील दोघांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील एक हजार रुपये रोख रक्कम आणि सहा हजारांचा मोबाईल फोन, एटीएम कार्ड काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना गहुंजे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला कारमधून खाली उतरवून मुंबईच्या दिशेने पलायन केले.

 

या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांकडे गाडीचा नंबर अथवा इतर काहीही माहिती नव्हती. हिंजवडी पोलिसांनी उर्से टोल नाका, सोमाटणे टोल नाका, खालापुर टोल नाका, तसेच पुणे सातारा रोडवरील टोल नाक्यावरील 80 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात पोलीस नाईक अरुण नरळे यांना संशयित आरोपींबाबत महिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी किरण आणि समाधान यांना हिंजवडी पोलीस ठाण्यात आणले आणि चौकशी केली. त्यात दोघांनी मिळून हे दोन गुन्हे केल्याचे मान्य केले. पोलिसांनी दोघांना अटक केली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख, सहाय्यक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस अंमलदार महेश वायबसे, बंडु मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कैलास केंगले, रितेश कोळी, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, दत्ता शिंदे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.