Hinjawadi : तरुणाच्या खून प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

बबल्या उर्फ महेंद्र अशोक तेलगोटे (वय 19, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गोल्या उर्फ शरद पवार (दोघेही रा. साखरे वस्ती हिंजवडी) आणि सागर कदम (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवल सुकलाल पावरा (वय 27, रा. साखरे-हुलावळे वस्ती, हिंजवडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत मयत निवल यांची पत्नी हिरा पावरा यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, निवल आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. आरोपी मित्रांनी आपसात संगणमत करून शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास निवल यांना ‘तुझ्याकडे महत्वाचे काम आहे’ असे म्हणून घरातून बाहेर बोलावले. निवल यांना रेडिसन ब्लू हॉटेलच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागेत नेत त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच डोक्यात दगड घातला. यामध्ये पावरा यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बबल्या याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.