Hinjawadi News: हिंजवडी, चाकणमध्ये तीन अपघात; एकाचा मृत्यू, सहाजण जखमी

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथे एका अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर चाकण परिसरात दोन अपघात झाले असून त्यात सहाजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 5) हिंजवडी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुण्यांची नोंद करण्यात आली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात उमेश शिदास चौधरी (वय 28, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मित्र अक्षय विनोद ठाकरे (वय 28, रा. एसीबी रोड पुणे) हा दुचाकीवरून बावधन ब्रिजवरून जात असताना अज्ञात वाहनाने ठाकरे याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये ठाकरे याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 5) पहाटे साडेतीन ते सव्वाचार वाजताच्या सुमारास घडला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

चाकण येथे झालेल्या पहिल्या अपघाताच्या घटनेत राजू सोपान केदारी (वय 29, रा. काळेवाडी, करंजगाव, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रविवारी मध्यरात्री बारा वाजता भोसे येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघाले. त्यांनी घरी जाण्यासाठी एका दुचाकीला लिफ्ट मागितली. त्यावेळी गजानन भांडवले (रा. खालूंब्रे, ता. खेड) यांनी त्यांची दुचाकी थांबवली. फिर्यादी केदारी हे भांडवले यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या एका दुचाकीने भांडवले यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यात फिर्यादी, भांडवले आणि समोरच्या दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले आहेत. त्या दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अण्णासाहेब सोपानराव धनक (वय 47, रा. शिवराई, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी दुस-या अपघाताच्या घटनेत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या ट्रकमध्ये औरंगाबाद येथून माल आणला होता. तो माल त्यांनी चाकण येथील कंपनीत खाली केला. त्यानंतर ते माल भरण्यासाठी शिक्रापूरकडे जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या एका कंटेनरने फिर्यादी यांच्या ट्रकला समोरून धडक दिली. यात फिर्यादी यांच्या मांडीचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.