Vadgaon Maval : सभापती बाबुराव वायकर यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे केले ढोल ताशाच्या गजरात शाळेत स्वागत

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत शाळेत स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सुमारे दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आता उघडल्या असून विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी सभापती बाबुराव वायकर यांनी हा अनोखा उपक्रम राबविला.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. आता कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शासनाने नियमितपणे लहान मुलांच्या इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा देखील सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील प्राथमिक शाळांची घंटा वाजली आहे. सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पोटोबा महाराज प्रांगण ते मुख्य बाजारपेठेतून ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढली.

सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या स्वखर्चातून मुलांना खाऊ वाटप करून शिक्षकांच्या हस्ते मुलांचे औक्षण करून विद्यार्थ्यांचे वर्गात स्वागत करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी संताजी जाधव, माजी उपसरपंच व पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त तुकाराम ढोरे, नाना भेगडे, सुदाम भिलारे, अनिल निकम, लक्ष्मण ढोरे, शांताराम कुडे, कचू जाधव, बाळासाहेब ढोरे, मुन्ना सोनवणे, माजी सरपंच-विठ्ठल मोहिते, माजी उपसरपंच अनिल मोहिते, सुनील दंडेल, गणेश पं ढोरे, सोनू चव्हाण, सुहास वायकर, अॅड अक्षय रौंधळ, सोनू पिंजण, अनिल खांदवे आदी, तसेच पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

अनेक दिवसांनी मुले शाळेत जात आहेत. सुमारे दोन वर्षानंतर मुले शाळांमध्ये पाऊल ठेवणार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील चैतन्य वाढविणे गरजेचे आहे. त्यांना शाळेची पहिल्या दिवसापासून आवड लागली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांना खाऊ व वह्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचे औक्षण करून वर्गात स्वागत केले असल्याचे सभापती बाबुराव आप्पा वायकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.