Hinjawadi : वाहतुकीच्या शिस्तीसाठी लेनचा पर्याय ; शिवाजी चौकात पीएमपीएमएल बससाठी स्वतंत्र लेन

एमपीसी न्यूज – हिंजवडी मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध पर्याय अवलंबिले जात आहेत. तसेच अन्य प्रशासकीय विभाग यासाठी सहकार्याची भूमिका घेत आहेत. हिंजवडी मधील शिवाजी चौकात पीएमपीएमएल बस थांबा आहे. चौकात बस थांबा असल्यामुळे प्रवासी रस्त्यावर येऊन बसची वाट पाहतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी हिंजवडी वाहतूक पोलिसांनी पीएमपीएमएल बससाठी स्वतंत्र लेन तयार केली आहे. यामुळे प्रवाशांना पीएमपीएमएल बस थांब्यावर थांबून बस पकडता येणार आहे.

हिंजवडीची वाहतूक कोंडी ही फार गंभीर समस्या आहे. ती सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी स्वतः पुढाकार घेतला. स्थानिक नागरिक, प्रवासी, लोकप्रतिनिधी, कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे उपाय सुरु केले आहेत. शिवाजी चौकातून डावीकडे वळून विप्रोसर्कल फेज वन येथून उजवीकडून वळून जॉमेट्रीक सर्कल चौक ते शिवाजी चौक अशी चक्राकार वाहतूक सुरुवातीला सुरु केली. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात धावती झाली. त्यानंतर नागरिकांच्या हरकती आणि सूचना लक्षात घेत वेळोवेळी इथल्या वाहतुकीत वेळोवेळी बदल देखील करण्यात आले.

शिवाजी चौकात हिंजवडी वाकड मार्गावर पीएमपीएमएल बस थांबा आहे. चौकात वाहने अनधिकृतरित्या पार्क करणे, पथारीवाले, किंवा अन्य कारणांमुळे प्रवासी भर रस्त्यात येऊन पीएमपीएमएल बसची वाट पाहायचे. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा येत होता. हिंजवडी वाहतूक विभागाने यावर उपाय करण्यासाठी बस थांब्याजवळील अडचणी दूर करत पीएमपीएमएल बससाठी स्वतंत्र लेन तयार केली. बस या लेनमधून आल्याने प्रवाशांना रस्त्यावर यावे लागणार नाही. यामुळे रस्ता मोकळा होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे म्हणाले, “प्रवासी रस्त्यावर आल्याने तसेच अन्य काही कारणांमुळे पीएमपीएमएल बस रस्त्याच्या मधोमध थांबत होती. याचा वाहतुकीला अडथळा होत होता. त्यामुळे ठराविक अंतराची पीएमपीएमएल बससाठी स्वतंत्र लेन तयार करण्यात आली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी लेनची शिस्त पाळणे अतिशय गरजेचे आहे. यामुळे अपघातांची संख्या देखील कमी होते. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.