Hinjwadi Crime News: ऑनलाईन बेटींग घेणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला दिले ढकलून; सात जणांना अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडीतील एका गृहनिर्माण सोसायटीतील फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑनलाईन बेटींग घेणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला फ्लॅटमध्ये येण्यास मज्जाव करून त्यांना ढकलून दिले. ही घटना हिंजवडी फेज-2 हायमाऊन्ट सोसायटी येथे शुक्रवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली.  याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा चार लाखांचे साहित्य जप्त केले आहे.

नारदमुनी नंदजी राम (वय-30), जयकुमार कुंदन मेहता (वय-18), सतीश कृष्णा कन्सारी (वय-29), चिंटूकुमार रामस्वरूप गुप्ता (वय-29), विक्रम महादेव काळे (वय-22), दिपक अशोककुमार सहा (रा.झारखंड), हरिशकुमार जी बैरागी (वय-24, सर्व रा.  हायमाऊन्ट सोसायटी, हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, चंद्रकुमार राकेश रूपवाणी (रा. छत्तीसगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महादेव भानुदास यलमार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ऑनलाईन बेटींग, जुगार चालविण्यासाठी सोसायटीतील रहिवाशांना कोणतीही कल्पना न देता फ्लॅट भाड्याने घेतला. आरोपी चंद्रकुमार रूपवाणी याच्या सांगण्यावरून ऑनलाईन बेटींगसाठी ग्राहकांकडून पैसे घेतले. याची माहिती उपनिरीक्षक यलमार यांना मिळाली. त्यानुसार कारवाईसाठी गेल्यानंतर आरोपींनी पोलिसांना फ्लॅटमध्ये येण्यास मज्जाव केला.

फिर्यादी यांनी आपण पोलीस असल्याचे सांगूनही त्यांना ढकलून देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. फ्लॅटमधून पोलिसांनी 3 लाख 60 हजार रूपये किंमतीचे 18 मोबाईल, सिमकार्ड, 60 हजार रूपयांचे दोन लॅपटॉप, दोन वायफाय राऊटर असा 4 लाख 22 हजारांचा ऐवज जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.