HSC Exam : 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी 3 हजार 320 केंद्रांवर देणार बारावीची परीक्षा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(HSC Exam )पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत घेतली जात आहे. राज्यात 3 हजार 320 केंद्रांवर 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी यावर्षी बारावीची परीक्षा देणार आहेत.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत पत्रकाद्वारे( HSC Exam )माहिती दिली आहे. राज्यातील 10 हजार 497 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 21 हजार 450 विद्यार्थी तर 6 लाख 92 हजार 424 विद्यार्थिनी आहेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

विज्ञान शाखेतून 7 लाख 60 हजार 46, कला शाखेतून 3 लाख 81 हजार 982, वाणिज्य शाखेतून 3 लाख 29 हजार 905, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) शाखेतून 37 हजार 226 आणि टेक्निकल सायन्स शाखेतून 4 हजार 750 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी महत्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळाकडून मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले आहे.

समुपदेशकांची नियुक्ती

परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार करतात. परीक्षेच्या मानसिक दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळात जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मंडळाकडून हेल्पलाईन सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

Chinchwad : गीता मंदिर प्राथमिक शाळेत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहोचा

परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या अगोदर अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना दिलेल्या हॉल तिकिटावर नमूद केले आहे. सकाळच्या सत्रात सकाळी 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात दुपारी 2.30 वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी 11 वाजता आणि दुपारी तीन वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीच्या परीक्षेसाठी देखील निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे.

राज्यात 271 भरारी पथके

राज्य मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असणार आहे. काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.