ICC : भारतीय संघाचा विंडीजवर मोठा विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर (ICC) अपेक्षित असा परिणाम साधत भारतीय संघाने विंडीजवर मोठा विजय मिळवत तीन एकदिवशीय सामन्याच्या मालिकेत घेतली विजयी आघाडी. कसोटी मालिकेत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघालाच एकदिवसीय मालिकेतही विजयासाठी जास्त प्राधान्य देण्यात येत आहे ते का याचा सोदाहरण दाखला देत भारतीय संघाने दणदणीत विजयासह मालिकेतही विजयी आघाडी घेतली आहे.

बार्बाडोस येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विंडीज संघाने शाय होपच्या नेतृत्वाखाली नवीन संघ नव्या सामन्यात उतरवून नवी सुरुवात केली खरी, पण त्यांच्या पदरात निराशाच पडली. होपने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्यानंतर थोड्याच वेळात भारतीय संघाने आपली करामत दाखवली आणि सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या मुकेश कुमारला आज पदार्पण करण्याची संधी दिली.

ब्रेंडोन किंग आणि कायले मेयरने विंडीजच्या डावाची सुरुवात केली, पण सामन्याच्या तिसऱ्या आणि आपल्या वैयक्तिक दुसऱ्याच षटकात हार्दिक पांड्याने मेयरला रोहितच्या हातून झेलबाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर किंगला साथ देण्यासाठी अथानजे मैदानावर उतरला खरा, पण त्यालाही (ICC) विशेष कामगिरी करता आली नाही.

या जोडीने दुसऱ्या गडयासाठी 38 धावांची भागीदारी केली असताना मुकेश कुमारने अथानजेला जडेजाच्या हातात झेल द्यायला लावून आपल्या एकदिवसीय सामन्यातला पहिला बळी नोंदवला. पुढच्याच षटकात ठाकूरने कींगला त्रिफळाचित करुन विंडीज संघाची अवस्था 3 बाद 45 केली.

यानंतर हेटमायर आणि कर्णधार होप जोडीने 43 धावांची विंडीजच्या डावातली सर्वोच्च भागीदारी करुन संघाला होप्स दाखवल्या खऱ्या, पण इथूनच पुढे सुरू झाले फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व. सामन्याच्या 18 व्या षटकात जडेजाने आपली करामत दाखवत हेटमायर आणि पोवेलला बाद करुन विंडीज संघाचा अर्धा संघ तंबूत पाठवला.

पुढच्या षटकात कुलदीप यादवने ड्रेक्सला आपल्या चायनामनवर मामु बनवून आपली पहिली विकेट मिळवली आणि यानंतर अतिशय भेदक गोलंदाजी करताना 3 षटकात फक्त 6 धावा देत चार बळी मिळवून विंडीज संघाची अवस्था 5 बाद 88 वरुन सर्वबाद 114 अशी केली.

त्याला जडेजानेही 3 बळी मिळवून उत्तम साथ दिली. विंडीज संघाकडून फक्त होपने एकाकी लढत देत सर्वाधिक 43 धावा काढल्या.

Pimpri : फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणावर हरकतींचा पाऊस

विजयासाठी केवळ 115 धावांचे माफक आव्हान घेवून भारतीय (ICC) संघाने सुरुवात केली. यावेळी भारतीय संघाने पुढील मोसमासाठीची तयारी म्हणून काही नवीन प्रयोग करून पाहण्यासाठी फलंदाजीत बदल करुन पाहिला. हा प्रयोग अंगलट आला नसला तरी चांगलाच फसला.

तर त्याचवेळी ज्यांच्याकडे उद्याचे भविष्य म्हणून बघितले जाते. त्यांच्या खांद्यावर आताच एवढी मोठी जबाबदारी टाकावी की न टाकावी या यक्ष प्रश्नांची उत्तरे भारतीय संघ व्यवस्थापनाला आता शोधावी लागणार आहेत.

रोहितने आज युवा गील आणि किशनला सलामीसाठी पाठवले. दोन्हीही कसोटीत विशेष कामगिरी न करता आलेल्या गीलला आज सुद्धा आपल्या लौकिकाला जागता आले नाही. 16 चेंडू खेळून तो फक्त 7 च धावा जोडू शकला. त्याला जेडन सील्सने एका अप्रतिम स्विंगवर चकवले आणि गीलने बाहेर जाणाऱ्या चेंडूचे चुंबन घेण्याचा केलेला प्रयत्न त्याच्याच अंगलट आला.

त्यानंतर आला तो सुर्यकुमार यादव. टी-20 मधला जगातला सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून भलेही तो जगप्रसिद्ध असेलही, पण त्याला कसोटीत तर सोडा पण एकदिवसीय संघातही आपले स्थान अजूनही पक्के करता आलेले नाही हे वादातीत सत्य आहे. आगामी विश्वकप स्पर्धेसाठी त्याला संघात आपला दावा सिद्ध करून दाखवण्यासाठी विंडीज संघा विरुद्ध धावा काढण्याइतकी सोनेरी संधी दुसरी कुठलीही नसेल, पण आज तरी त्याला आपल्या कामगिरीने संघ व्यवस्थापनाला भरोसा देता आला नाही.

त्याने केवळ 19 च धावा केल्या. तो विंडीज संघाचा नवोदित पण अतिशय प्रतिभावंत युवा डावरा फिरकी गोलंदाज मोतीची शिकार ठरला. त्यानंतर आलेल्या पांड्यालाही आपले हात आजमवण्या आधीच दुर्दैवी रित्या धावबाद व्हावे लागले. इतका वेळ जबरदस्त फलंदाजी करुन आक्रमक अर्धशतक नोंदवनारा किशनही एक उंच फटका मारण्याची घाई करुन बाद झाला तर शार्दूल ठाकूरनेही दिलेल्या बढतीचा फायदा घेता आला नाही.

यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 5 बाद 97 अशी होती. आणि खेळपट्टी फिरकीला जबरदस्त वश झाली होती. तरीही आव्हान किरकोळ असल्याने कसलीही भिती नव्हतीच, तसेच झाले. पदार्पणातनंतरच्या दीर्घ काळात त्यानंतर आज पहिल्यांदाच 7व्या क्रमांकावर आलेल्या रोहितने जडेजाच्या साथीने संघाला पाच गडी आणि 27 षटके राखून मोठा विजय मिळवून दिला.

भारतीय संघाचा विंडीजमधला एकदिवशीय सामन्यातला हा एक मोठाच विजय आहे. जडेजा 16 तर रोहित 12 धावा करुन नाबाद राहिले. वेस्ट इंडीजकडून मोतीने खूप प्रभावित करणारी गोलंदाजी करुन सर्वाधिक दोन गडी बाद केले,पण त्याला मजबूत भारतीय संघाला रोखणे सोपे नव्हतेच.

या विजयासह भारतीय संघाने तीन दिवशीय सामन्यात 1/0 अशी आघाडी घेतली असून मालिकेतला दुसरा सामना येत्या शनिवारी होणार असून त्यातही विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. अतिशय भेदक गोलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
विंडीज 23 षटकात
सर्वबाद 114
होप 43,अथानेज 22,किंग 17
जडेजा 37/3,यादव 6/4
पराभूत विरुद्ध
भारत
22.5 षटकात 5 बाद 115
किशन 52,गील 7,पंड्या 5,सुर्यकुमार 19
रोहित नाबाद 12,जडेजा नाबाद 16
मोती 26/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.