Thergaon News : घरात अवैधरित्या दारूची साठवणूक आणि विक्री

देशी-विदेशी दारूचे 36 बॉक्स जप्त

एमपीसी न्यूज – घरात अवैधरित्या दारूची साठवणूक करून त्याची विक्री केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पोलिसांनी विदेशी दारूचे सात आणि देशी दारूचे 29 बॉक्स जप्त केले आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) रात्री नखाते नगर, थेरगाव येथे केली आहे.

शामसिंग रामसिंग ठाकूर (वय 50), निहाल मदन घमंडे (वय 32, दोघे रा. नखाते नगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नखाते नगर, थेरगाव येथील शामसिंग ठाकूर याचे रुममध्ये विनापरवाना अवैधरित्या आर्थिक फायद्यासाठी देशी-विदेशी दारुच्या बाटल्याची साठवणूक करुन विक्री केली जाते. अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सापळा रचून ठाकूर याच्या रूमवर छापा टाकला.

या छाप्यामध्ये पोलिसांनी विदेशी दारूचे सात बॉक्स त्यात 336 बाटल्या आणि देशी दारूचे 29 बॉक्स त्यात एक हजार 392 बाटल्या असा एकूण एक लाख 33 हजार 920 रुपयांचा दारुसाठा जप्त केला. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, प्रणिल चौगले, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, गणेश कारोटे, राजेश कोकाटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.