Monsoon Updates: यंदा 102 टक्के पाऊस, आयएमडीचा सुधारित अंदाज

IMD declares the onset of Southwest Monsoon 2020 over Kerala Monsoon rainfall between June to September over the country would be 102 percent of its long period average

एमपीसी न्यूज- मॉन्सूनने केरळमध्ये आगमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आज (दि.1) याची घोषणा केली. दक्षिण पश्चिम मॉन्सून केरळमध्ये दाखल होताच पावसाचा चार महिन्याचा हंगाम सुरु झाला आहे. यंदा देशभरात हंगामातील सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडणार असल्याचे आयएमडीच्या सुधारित अंदाजात म्हटले आहे.


आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र म्हणाले की, दक्षिण-पश्चिम मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या मॉन्सूनमुळे देशात 75 टक्के पाऊस पडतो.

हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटने 30 मे रोजीच मॉन्सून आल्याची घोषणा केली होती. परंतु, आयएमडीने त्याला नकार देत अशा प्रकारची घोषणा करण्यासारखी स्थिती अजून झाली नसल्याचे म्हटले होते.


दरम्यान, आयएमडीने १ जूनला संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर २ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मॉन्सूनने केरळमध्ये ठरलेल्या वेळी आगमन केले आहे. दरम्यान, केरळमध्ये काही दिवसांपासूनच मॉन्सूनपूर्व पाऊस सुरु झाला होता. राजधानी तिरुवनंतपूर येथे आज मुसळधार पाऊस झाला.

मृत्युंजय महापात्र म्हणाले की, यावर्षीही ईशान्य भारतात कमी पाऊस पडेल. ईशान्य भारतात गेल्या अनेक वर्षांपासून कमी पाऊस पडत आहे. यावर्षीही तिथे 96 टक्के पाऊस होईल.


यंदा देशभरात हंगामातील सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडणार असल्याचे आयएमडीच्या सुधारित अंदाजात म्हटले आहे. वायव्य भारतात 107 टक्के, मध्य 103, दक्षिण 102, ईशान्य भारतात 96 टक्के पाऊस पडण्याचा तर जुलै 103, ऑगस्ट 97 टक्के पाऊस पडणार असल्याचा आयएमडीचा अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.