IND VS BAN : बांगलादेशने ठेवले भारतापुढे 257 धावांचे लक्ष्य

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) पुणे येथील गहूंजेच्या मैदानावर सुरु असलेल्या (IND VS BAN ) भारतीय संघाच्या चौथ्या सामन्यातल्या चौथ्या विजयासाठी भारतीय संघाला 300 चेंडूत 257 धावा कराव्या लागणार आहेत. बांगलादेश विरुद्धच्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल हंगामी कर्णधार शांतोच्या बाजूने लागला आणि त्याने क्षणार्धात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जे अपेक्षितच होते. बांगलादेशचा कर्णधार शकिब उल दुखापतग्रस्त झाल्याने आज नजमुल शांतोला नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तर भारतीय संघाने आधीच्याच सामन्यातला विजयी संघ कायम ठेवत गीलच्या नसण्याची सर्व शक्यता मोडून टाकली.

बांगलादेशच्या डावाची सुरुवात तांझो हसन आणि लिटन दास या जोडीने अतिशय शानदाररित्या केली. दोघांनाही खेळताना कसलीही अडचण येतेय असे वाटलेच नाही. ही जोडी  15 व्या षटकापर्यंत स्फोटक फलंदाजी करत होती, अखेर 93 धावांची वेगवान भागीदारी नोंदवल्यानंतर हसनला कुलदीप यादवने पायचीत करुन ही जोडी तोडली.

हसनने अतिशय शानदार फलंदाजी करत आपले पहिले अर्धशतक पूर्ण करताना भेदक म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय गोलंदाजांचा समर्थ सामना केला. त्याने 43 चेंडूत 5 चौकार आणि तीन षटकार मारत 51 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शांतोला मात्र आज विशेष काही योगदान देता आले नाही आणि तो केवळ 8 धावा करुन जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

Pune : सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन

दुसऱ्या बाजूने लिटन दास जोशात खेळत होता. त्यानेही आपले अर्धशतक पूर्ण करून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केली (IND VS BAN ) होती. याचदरम्यान सिराजने मेहदी हसनला बाद करुन भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले तर जडेजाने खतरनाक खेळत असलेल्या लिटन दासला बाद करून बांगलादेश संघाची अवस्था 4 बाद 137 अशी केली, मात्र यानंतर महमूदल्लाने, मुशफिकिर रहीमच्या साथीने जोरदार प्रतिकार करत बांगलादेशला 250 धावांच्या वरची धावसंख्या गाठून देण्यात मोठा वाटा उचलला.

भारताकडून शार्दुल ठाकूर आणि सिराज काहीसे महागडे ठरले पण, तरीही इतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या माऱ्यापुढे बांगलादेश संघ 256 च धावा करु शकला. भारतीय संघाकडुन बुमरा, सिराज आणि जडेजाने प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि ठाकूरने प्रत्येकी एक गडी बाद केला.

उत्तरादाखल खेळताना हे वृत्त लिही पर्यंत भारतीय संघाने 6 षटकात नाबाद 41 धावा चोपत शानदार सुरुवात करून दिली होती.

-विवेक कुलकर्णी 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.