IND VS PAK : रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानने भारताला पाच गडी राखून केले पराभूत

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी): भारत पाकिस्तान (IND VS PAK) या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील चुरस तमाम क्रिकेटरसिकांना बघायला मिळालीच. रोमहर्षक सामन्यात महत्त्वाच्या क्षणी समजदारी दाखवत पाकिस्तान संघाने केलेल्या खेळामुळे भारतीय संघाला आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. कोहलीचे आणखी एक झुंजार अर्धशतक आज मात्र संघाला विजयाची चव चाखवू शकले नाही आणि पाकिस्तान संघाने कर्णधार बाबरच्या अपयशानंतरही जबरदस्त खेळ करत भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला आणि साखळी सामन्यात मिळालेल्या पराभवाची सव्याज परतफेडही केली.

मोठ्या धावसंख्येचे रक्षण न करु शकलेली भारतीय गोलंदाजी विश्वकप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने अतिशय चिंतेचा विषय नक्कीच आहे. आज रोहीतची काळजी नक्कीच वाढली असेल. भारत पाकिस्तान या दोन संघात होणाऱ्या कुठल्याही सामन्याकडे जगभराचे लक्ष लागून राहिलेले असते. त्यातच सामना रविवारी असेल आणि भारतीयांचे लाडके बाप्पा आलेले असताना होत असेल, तर भारतात एक वेगळेच वातावरण असते. आजही तशाच पद्धतीचे एक आगळेवेगळे आणि स्वयंघोषित कर्फ्युचे वातावरण बघायला मिळाले.

हायव्होल्टेज सामना असे क्रिकेटच्या चिरपरिचित भाषेत भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातल्या कुठल्याही सामन्याला म्हटले जाते. विश्वकप स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघाला पाकिस्तान संघाने 2019 मध्ये मात दिल्यानंतर भारत-पाक या दोन संघातला सामना मागच्याच रविवारी आशिया कप स्पर्धेतल्या साखळी सामन्यात झाला. ज्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पाच गडी राखून नमवले आणि त्या ठसठसणाऱ्या जखमेवर मलमपट्टी केली. पण, कुठल्याही फॉरमॅटमध्ये अतिशय खतरनाक संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघाने निराश न होता, आपला पुढील सामना जिंकून (जे अपेक्षितही होतेच) सुपर फोरमध्ये प्रवेश केला.

काल पुन्हा हे दोन्ही (IND VS PAK) संघ भिडले. त्यामुळे साहजिकच पाकिस्तान परवाच्या पराभवाचे उट्टे काढणार की भारतीय संघ आपले विश्वकप स्पर्धेतले पाकिस्तानवर असलेले वर्चस्व अबाधित ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. कालच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाने तीन बदल केले. हार्दिक पंड्या, रवी बिश्नोई आणि दीपक हुडाला अंतीम 11 मध्ये स्थान मिळाले. अष्टपैलू पण जायबंदी जडेजा, वेगवान गोलंदाज आवेश खान आणि दिनेश कार्तिकला या बदलामुळे संघाबाहेर जावे लागले.

आजच्या सुपर फोरमधील दुसऱ्या आणि भारतीय संघाच्या पहिल्या सामन्याला आज दुबईच्या इंटरनॅशनल मैदानावर सुरुवात झाली. ज्यात, नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल पाकिस्ताच्या बाजूने लागला. पाकिस्तान कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रोहीत शर्मा आणि के एल राहूल या जोडीने भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करुन देताना पहिल्या 5 षटकातच 54,धावा ठोकल्या. मात्र, याच नादात रोहित सहाव्या षटकात जोरदार फटका मारण्याच्या नादात रौफच्या गोलंदाजीवर फकर जमानच्या हातून 28 धावा काढून झेलबाद झाला. त्याने केवळ 16 चेंडूत या धावा ठोकल्या आणि भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 31 चेंडूत (5.1 षटकात) 1 बाद 54 अशी मजबूत होती.

त्यानंतर पुढच्याच षटकात के एल राहुलसुद्धा चांगल्या सुरुवातीनंतर असाच एक आक्रमक फटका मारण्याच्या नादात शादाब खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. राहूलने 20 चेंडूत 2 षटकार आणि एक चौकार मारत 28 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर आला तो अतिशय चांगल्या अशा फॉर्मात असणारा युवा प्रतिभावंत फलंदाज सुर्यकुमार यादव. त्याने अतिशय धडाकेबाज अशी सुरुवात केली खरी, पण त्याचा हा धडाका अतिशय क्षणिक असाच राहिला. त्याने फक्त 10 च धावा केल्या. मात्र, या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारतीय संघाने पहिल्या 10 षटकातच 93 धावा ठोकल्या. मात्र त्यांचे तीन महत्वपूर्ण गडीही बाद झाले होते. त्यानंतर मैदानावर आला तो ऋषभ पंत, त्याच्या जोडीला होता, विराट कोहली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 35 धावांची छोटी पण महत्वपूर्ण भागीदारी केली. पंत चांगला खेळतोय असे वाटत असतानाच त्याची खेळी 14 धावांवर 14 व्या षटकातच समाप्त झाली. त्यालाही शादाब खाननेच बाद केले.

त्यापाठोपाठ आलेल्या हार्दिक पंड्यालाही हसनेनने आल्या पावलीच वापस पाठवले आणि भारतीय संघाला फार मोठा धक्का बसला. कारण यामुळे भारतीय संघाची अवस्था 4 बाद 126 वरुन 5 बाद 131अशी झाली. यानंतर भारतीय फलंदाजावर आलेल्या दबावाचा पाकिस्तान गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत अचूक फायदा उचलला. तरीही विराट कोहलीने आपल्या सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला 181 धावांची चांगली धावसंख्या गाठून दिली. कोहलीने 44 चेंडूत 60 धावा करुन आपल्याला सुर गवसतोय याची गोड अनुभूती तमाम चाहत्यांना दिली. त्याला हुडाने 16, तर बिष्णोईने दोन चेंडूत 2 चौकार ठोकत 8 धावा करत उत्तम साथ दिली. यामुळे भारतीय संघाने आपल्या निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 181 धावा करता आल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर नवाझ, नसीम, हसनेनने प्रत्येकी एकेक गडी बाद केला.

भारतीय संघाने मागच्याच (IND VS PAK) आठवड्यात दिलेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तान संघाला 120 चेंडूत 182 धावा करायच्या होत्या. त्यासाठी मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांनी डावाची सुरुवात करताना भुवनेश्वरच्या पहिल्याच षटकात दोन खणखणीत चौकार मारत 9 धावा काढत सुरुवात तरी जबरदस्त केली. मात्र, रवी बिष्णोईने आपल्या पहिल्याच षटकात खतरनाक बाबर आझमला बाद करुन आपल्या संघाला मोठे यश मिळवून दिले. बाबरचा खराब फॉर्म लागोपाठ तिसऱ्या सामन्यातही तसाच राहीला, पण तरीही तो बाद होताच भारतीय संघाने एकच जल्लोष केला.

Mass Stabbing In Canada : कॅनडामध्ये चाकू हल्ला; 10 लोकांचा मृत्यू तर आणीबाणी जाहीर

या धक्क्याने जराही विचलित न होता फखर जमान आणि रिझवान यांनी लढाई चालू ठेवत दुसऱ्या गड्यासाठी 39 धावांची वेगवान भागीदारी करत पाकिस्तान किती खतरनाक संघ आहे, याचे संकेत दिले. जमान डोकेदुखी वाढवणार असे वाटत असतानाच चतुर चहलने त्याची छोटी खेळी समाप्त केली. त्यानंतर पाकिस्तान संघाने मोहम्मद नवाजला फलंदाजीसाठी बढती देत भारतीय संघाला आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या जोडीने प्रतिकार चालू ठेवत मोहम्मद रिझवानने केवळ 37 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत पाकिस्तान संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्याला नवाज नबाबासारखे खेळून चांगलीच साथ देत होता. बघताबघता ही जोडी सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकवण्यात यशस्वी झाली ही आशंका भेडसावत असतानाच अनुभवी भुवनेश्वरने खतरनाक नवाजची छोटी पण स्फोटक खेळी संपवून भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. यानंतरही सामना पाकिस्तानच्याच बाजूने झुकला होता.

कारण यानंतर पाक संघाला 27 चेंडूत 46 धावांची गरज होती आणि रिझवान जबरदस्त खेळत होता. तर, त्याचा जोडीदार नवाजने केवळ 20 चेंडूत 6 चौकार आणि दोन षटकार मारत 42 धावा ठोकून आणि सामना पाकिस्तानच्या बाजूला झुकवून बाद झाला. यानंतर भारतीय संघ पराभवाच्या जवळ आलाय असे वाटत असतानाच आतापर्यंत या सामन्यात महागडा ठरलेल्या पंड्याने आपल्या शेवटच्या षटकात जम बसलेल्या रिझवानला बाद करत पाकिस्तान गोटात एकच खळबळ उडवून दिली. रिझवानने महत्वपूर्ण 71 धावा केल्या. यावेळी पाकिस्तान संघावर दडपण आलेले असताना मात्र भारतीय गोलंदाजांनी काहीशी स्वैर गोलंदाजी करुन पाकिस्तानचे दडपण बरेचसे कमी केले.

त्यातच अर्शदीपनेही असिफचा हातात आलेला झेल सोडून सामना पाकिस्तानला जवळपास बहाल केला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी फक्त 7 च धावा हव्या होत्या. कारण अनुभवी भुवनेश्वरचे 19 वे षटक खूपच महागडे ठरले. ज्यात 19 धावा आल्या. आता सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने पुन्हा झुकला होता. नवोदित अर्शदीपला ते दडपण झेपले नाही आणि पाकिस्तानने जबरदस्त पलटवार करत भारतीय संघाला 5 गडी आणि 1 चेंडू राखून दणदणीत पराभूत करत आधीच्या पराभवाचे उट्टे काढले. आक्रमक 42 धावा काढणारा आणि उपयुक्त गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद नवाजला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
भारत 7 बाद 181
कोहली 60, रोहीत 28, राहुल 28, हुडा 16, पंत 14, यादव 13, शादाब खान 31/2, नवाज 25/1

पराभूत विरुद्ध
पाकिस्तान
19 षटकात 5 बाद 182
मोहम्मद रिझवान 71,आझम 14,झमान 15,नवाज 42आसिफ अली 16
पंड्या 44/1,चहल 43/1,अर्शदीप 27/1,भुवी 40/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.