IND Vs SA 2nd Test Day 1 : भारताचा डाव गडगडला; 202 धावांवरच डाव संपुष्टात

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी)- आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बलाढ्य भारतीय संघ केवळ 202 धावात गारद झाला. उत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिका संघाने एक गडी गमावून 35 धावा केल्या असून अजूनही यजमान संघ 167 धावांनी मागे आहे.

जोहान्सबर्ग मैदानावर इतिहास रचण्याची सुवर्णसंधी असलेल्या भारतीय संघाचा इथला अपराजित असण्याचा इतिहासही या बाबतीत भारतीय संघाच्या बाजूने आहे. त्यामुळे या कसोटीतच विजय मिळवून मालिकाही जिंकण्याच्या भारतीय संघाच्या स्वप्नाला आज पहिल्या दिवशी तरी सुरूंगच लागला आहे. अतिशय खराब आणि आत्मघातकी फलंदाजी करत भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या खेळावर आपल्याच हाताने कुऱ्हाड मारून घेतली आहे.

आज सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली. नियमित कर्णधार विराट कोहली पाठदुखीमुळे या सामन्यात खेळणार नाही, असे जाहीर करण्यात आले,पण त्याच्या जागी कर्णधारपदाचा काटेरी मुकुट की सुवर्णसंधी लोकेश राहुलला लाभली.

त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा,पण भारतीय संघाने हा निर्णय चुकीचा वाटावा अशीच कामगिरी करत आपल्या कर्णधाराला पहिल्या डावात तरी निराश केले, असे नाईलाजाने का होईना पण म्हणावेच लागेल.

राहुलने सुद्धा आज पुजारा आणि रहाणेलाच पसंती देत श्रेयस अय्यरच्या पदरी आजही निराशाच दिली. त्याच्या ऐवजी हनुमा विहारीला अंतिम अकरात स्थान मिळाले,तर आफ्रिका संघाने त्यांचा ओलीवीयर या युवा पण गुणवान जलदगती गोलंदाजाला संधी दिली.

भारतीय सलामी जोडीने खरेतर सुरुवात चांगली केली होती,मयंक आगरवाल चांगल्या आत्मविश्वासाने खेळत होता, तर राहूल त्याला योग्यरित्या साथ देत होता. मयंकने आक्रमक अंदाजात फलंदाजी केली खरी, पण याच नादात तो यंसेनच्या गोलंदाजीवर वीरलीनच्या हातात झेल देऊन तो वैयक्तिक 26 धावांवर बाद झाला. यात त्याने 5 चौकार मारले, यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 36 होती.

त्यानंतर आलेल्या पुजाराने पुन्हा एकदा सर्वानाच निराश केले. त्याने 33 चेंडू खेळुन फक्त तीन धावा काढल्या. त्याच्या जागी आलेल्या रहाणेने त्याला बळ मिळावे म्हणून की काय ‘तू चल मै आया’ म्हणत पहिल्याच चेंडूवर बाद होऊन तंबूचा रस्ता पकडला.

नि:संशय या दोन महान खेळाडूंनी भारतीय संघाला खूप मोठे आणि अविस्मरणीय असे योगदान दिले आहे. मी या दोघांचा खुप मोठा चाहता ही आहे. पण यांचे हे असे खराब प्रदर्शन बघवत  नाही. त्यांनी खरोखरच काही दिवस आत्मचिंतन करून आपल्या फलंदाजीतल्या दोषांना दूर करायला हवे, नाहीतर लवकरच त्यांचे संघातले स्थान धोक्यात येईल.

या दोघांनाही ओलीवीरने बाद करत दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वात जलद पहिल्या पन्नास कसोटी बळी मिळवण्याऱ्या गोलंदाजाच्या यादीत प्रथम पण संयुक्त तिसरे स्थान मिळवले, त्याच्या या तुफानी गोलंदाजीमुळे भारतीय संघाची अवस्था तीन बाद 49 अशी बिकट झाली होती.

यानंतर खूप मोठया कालावधीनंतर संघात स्थान मिळालेल्या हनुमाविहारीने कर्णधार राहुलला साथ देण्याचा बऱ्यापैकी चांगला प्रयत्न केला. बऱ्यापैकी यासाठीच की ही भागीदारी सुद्धा जास्त वेळ टिकली नाही,पण तरीही त्यांनी चौथ्या गड्यासाठी 52 धावांची बहुमूल्य भागीदारी नोंदवली. आतापर्यंत संयमाने खेळणाऱ्या हनुमाविहारीला रबाडाने मोहात पाडत त्याचा बळी घेतला. त्याने वीस धावा केल्या.

या पडझडीतही राहूल मात्र नेटाने आपली जबाबदारी निभावत होता.यादरम्यान त्याने आपले तेरावे आणि कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीतले पहिले अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतक पूर्ण झाल्यावर त्याचीही एकाग्रता भंग झाली आणि तो वैयक्तिक पन्नास धावांवर यंसेनच्या गोलंदाजीवर रबाडाच्या हाती झेल देवून बाद झाला. एव्हाना भारतीय संघाची अवस्था अतिशय बिकट झाली होती.

केवळ 116 धावा काढण्यासाठी सहा गडी धारातीर्थी पडले होते. भारतीय संघाच्या 150 तरी धावा होतील का अशी आशंका वाटत असतानाच रवी अश्विन पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आला. त्याला पंतने साथ द्यावी असे वाटत असतानाच पंतने सर्वाना निराशच केले. तो फक्त 17 धावा काढून यंसेनच्या एका अप्रतिम स्विंगवर चकला आणि यष्टीमागे विरीयनने तो झेल टिपण्यात जराही कुचराई केली नाही.

पाठोपाठ शार्दूल ठाकूरही बाद झाला आणि भारतीय संघ एकदमच खिंडीत अडकला,पण अश्विनने दडपण झुगारून आक्रमक 46 धावा केल्या ज्यामुळेच भारतीय संघ 200 धावांचा टप्पा पार करु शकला. अखेर तो ही यंसेनची चौथी शिकार ठरला आणि भारतीय संघ केवळ 202 धावातच गारद झाला. यंसेनने चार तर रबाडा आणि ओलीवीरने तीन तीन गडी बाद करत भारतीय संघाला फार स्वस्तात गुंडाळले. भारतीय संघाकडून राहुल आणि अश्विन सोडले तर इतरांनी फक्त निराश आणि निराशच केले.

उत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात सुद्धा फार काही चांगली झाली नाही. मोहम्मद शमीने मार्करमला वैयक्तिक सात आणि संघाची धावसंख्या 14 असताना बाद करत पहिला धक्का लवकरच दिला पण त्यानंतर तब्बल 15 षटके सहजपणे खेळून काढत कर्णधार एल्गर आणि पीटरसन या जोडीने भारतीय संघाला आणखीन यश मिळू दिले नाही ते नाहीच. अखेर आजचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने एक गडी गमावून 35 धावा धावफलकावर लावल्या आहेत.

आजच्या पहिल्याच दिवशी तब्बल अकरा गडी बाद झाल्याने ही खेळपट्टी उद्या काय काय रंग दाखवेल याची उत्सुकता सर्वानाच असेल,दक्षिण आफ्रिका संघाकडेही एक दोनच अनुभवी नावे असल्याने त्यांच्या विकेट्स जर लवकर काढण्यात भारतीय गोलंदाज उद्या यशस्वी झाले तर ही धावसंख्या सुध्दा कमी वाटणार नाही. यजमान संघ उद्या जास्तीत जास्त आघाडी मिळवण्यासाठी नक्कीच जान की बाजी लावणार आहेच, त्यामुळे उद्या काय काय होईल याची उत्सुकता सर्वाना नक्कीच असणार आहे, बरोबर ना?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.