Mula Mutha River Crises : विकास की भकास? नदीपात्रांमध्ये अपरिवर्तनीय आणि आमूलाग्र विघातक विकासकामांचे आक्रमण

एमपीसी न्यूज – जल सिंचन विभागाच्या मुख्य अभियंतांनी काढलेल्या मनाई हुकुमाला न जुमानता गेल्या 04 ते 05 दिवसांपासून बंड गार्डन लगतच्या नदी पात्रात (Mula Mutha River Crises) पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदारांनी राज्य सरकारनी स्थगित केलेल्या नदी सुधार प्रकल्पाचे काम बांधकाम रेटून चालू केल्याचे पुणे शहरातील जबाबदार नागरिकांनी पुराव्या सकट निदर्शनात आणले आहे. मोठी मोठी खोदकामाची यंत्रे व मालवाहू वाहने लावून नदीपात्राच्या काटछेदामध्ये अपरिवर्तनीय बदल (जल सिंचन विभागाच्या परवानगीशिवाय) सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

या क्षेत्रातल्या तज्ञ, स्थानिक नागरिक तसेच बऱ्याच बिन सरकारी संस्थांच्या सदस्यांनी वारंवार निदर्शनास आणून दिले आहे कि बंडगार्डन पासून कोरेगांव पार्क स्मशान भूमी ते सलीम अली अभयारण्यापर्यंतच्या नदीच्या पात्रात विविध पक्षांच्या रहिवासाच्या खास जागा आहेत, त्यांची घरटी आहेत. उथळ पाणवठ्याच्या जागा आहेत. खडकाळ आडोसे आहेत. ह्या सगळ्यांमुळे इथे भरपूर जैवविविधता आहे आणि अशी जागा व जीवश्सृष्टी पुण्यात इतरत्र अभावानेच पहायला मिळते.

Kamshet Accident : कामशेत-नाणे येथील रस्ता खचल्याने डंपर पलटी, रस्ता दर्जेदार नसल्याने अपघात

तसेच नदी (Mula Mutha River Crises) काठी पसरणाऱ्या देशी आणि नदीला पोषक वृक्षांची, झुडुपांची आणि वेगवेगळ्या गवताची  सुद्धा या भागात रेलचेल आहे. या अशा दुर्मिळ परिसरामुळे ब्राह्मणी बदके, ग्लॉसि आणि काळे आयबिस, सँडपायपर्स, रिव्हर टर्न्स अशा विविध पक्ष्यांचा इथे अधिवास आहे. या भागात बरेच उथळ पण शुद्ध पाण्याचे जलधर सुद्धा आहेत.

हे सगळे नैसर्गिक भूजल साठे नदीला शुद्ध पाणी पुरवण्याचे महत्त्वाचे काम अनादी काळा पासून करत आले आहेत. आत्ता चालू असलेल्या अशासत्रीय आणि नियोजनाचा अभाव असलेल्या हस्तक्षेपामुळे ते कायमचे बंद होणार आहेत.

दरम्यान, जबाबदार पुणेकर नागरिक बऱ्याच दिवसांपासून खालील प्रश्न सातत्याने विचारत आहेत, पण कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याकडून एकही समाधानकारक उत्तर अजूनपर्यंत मिळालेले नाही.

  • जल संधारण विभागाच्या मुख्य अभियंतांनी काढलेल्या मनाई हुकूमाला न जुमानता हे काम का चालू करण्यात आले आहे?
  • नदी पात्रात राडा रोडा टाकला गेल्यामुळे पात्र अरूंद होऊन पावसाच्या तोंडावर पुराचा धोका वाढणार आहे. ह्याला कोण जबाबदार आहे?
  • ह्या खोदकामामुळे या संवेदनशील क्षेत्राच्या  पर्यावरणाचा समतोल परत कोण आणि कसा मिळवून देणार आहे?
  • भूगर्भातील उथळ जलधर तसेच जिवंत झऱ्यांचे रक्षण कसे होऊ शकणार आहे? पावसाळा संपल्यावरही भूगर्भातील जलधर आणि झरे नदीला जिवंत ठेवण्याची बहुमोल कामगिरी करत असतात. यांचे सर्वतोपरी सर्वेक्षण झाल्या शिवाय या भागात उत्खननाचे काम कसे चालू झाले आहे? या झऱ्यांचे संरक्षण आणि संवर्धन कसे केले जाणार आहे?
  • नदीचा काटछेद कमी करून नदीची पूर वहन क्षमता कशी वाढणार आहे? या अतिरिक्त बोज्याचा भार सामान्य नागरीकाना करावाटे द्यावा लागणार आहेच, पण भर घालून नदीची पूर वहन क्षमता कमी करून येऊ घातलेल्या संभाव्य पुराच्या धोक्याची जबाबदारी कोण घेणार आहे- जलसिंचन विभाग, मनपा की या प्रकल्पाचे सल्लागार? नागरिकांच्या या सर्व प्रश्नाना समाधानकारक उत्तरे मिळालीच पाहिजेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.